मनोहर शिंदे, (नाशिक) १३ सप्टेंबर - नाशिक जिल्ह्याला 'इलेक्ट्रिक व्हेईकल' (EV) आणि 'इलेक्ट्रिक मोबिलिटी' क्षेत्रातील देशाचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी नाशिक येथील सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI) च्या परिसरात अत्याधुनिक 'EV Testing Facility / Centre of Excellence' स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र दिले आहे.
नाशिक हे महाराष्ट्रातील प्रमुख ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रिकल हब म्हणून ओळखले जाते. येथे कुशल मनुष्यबळ, उत्तम दळणवळण आणि तांत्रिक शिक्षण संस्था उपलब्ध असल्याने EV क्षेत्राच्या विकासासाठी नाशिकमध्ये मोठी क्षमता आहे, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.
स्थानिक उद्योजकांचा वेळ आणि खर्च वाचणार
देशात इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी आणि चार्जिंग सिस्टीमची निर्मिती वेगाने वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या चाचणी (Testing), व्हॅलिडेशन आणि प्रमाणपत्रासाठी (Certification) विश्वासार्ह सुविधेची गरज आहे. नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यास:
वेळ व खर्चात बचत: नाशिकसह महाराष्ट्रातील EV आणि ऑटो घटक उत्पादकांना स्थानिक पातळीवरच टेस्टींग सुविधा मिळेल.
संशोधन व विकासाला चालना: बॅटरी तंत्रज्ञान, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या क्षेत्रांत संशोधन (R&D) आणि इनोव्हेशनला मोठा वाव मिळेल.
रोजगारनिर्मिती: या क्षेत्रातील नव्या कौशल्यांमुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
केंद्र सरकारकडे शिफारसीची मागणी
CPRI नाशिकच्या विद्यमान पायाभूत सुविधांचा प्रभावी विस्तार करून येथे नवे तंत्रज्ञान आणणे सोयीचे ठरेल. यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडे आणि CPRI कडे प्रस्तावाची शिफारस करावी; तसेच 'फिजिबिलिटी स्टडी' (Feasibility Study) आणि विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे. नाशिकमध्ये ही टेस्टींग इकोसिस्टम तयार झाल्यास देशभरातील EV उत्पादक नाशिककडे आकर्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.