नाशिक, (प्रतिनिधी) १३ सप्टेंबर - नोंदणीकृत दस्त, सूची क्रमांक २ किंवा विवाह प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी आता नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयाचे खेटे घालण्याची गरज उरणार नाही. नोंदणी व मुद्रांक विभागाने ‘ई-प्रमाण’ (e-Praman) ही ऑनलाइन सेवा सुरू केली असून, नागरिकांना घरबसल्या २४ तास डिजिटल स्वाक्षरीयुक्त (Digitally Signed) प्रमाणित प्रत उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैशांची मोठी बचत होईल, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी संदीप आहेर यांनी दिली.
अशी मिळणार ऑनलाइन प्रमाणित प्रत
१. नागरिकांनी प्रथम epraman.igrmaharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी (Registration) करून लॉगिन करावे.
२. ‘ई-सर्च’ सुविधेच्या साहाय्याने आपला आवश्यक नोंदणीकृत दस्त शोधावा आणि 'ई-प्रमाण' पोर्टलवर अर्ज करावा.
३. अर्जाचा आवश्यक तपशील भरून नियमानुसार फी ऑनलाइन भरावी.
४. प्रक्रिया पूर्ण होताच डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रत पोर्टलवरून डाउनलोड करता येईल. तसेच ही प्रत एसएमएस (SMS) आणि ई-मेलद्वारेही पाठवली जाईल.
डिजिटल प्रतीमुळे थेट ६३० रुपयांची बचत!
कागदी स्वरूपातील प्रत आणि डिजिटल प्रत यांच्या खर्चात मोठा फरक असून, डिजिटल प्रत अत्यंत किफायतशीर आहे:
कागदी प्रत (उदा. ३० पानांचा दस्त): प्रति पान २५ रुपये या दराने तब्बल ७५० रुपये खर्च येतो.
डिजिटल प्रत (उदा. ३० पानांचा दस्त): पहिल्या २० पानांसाठी १०० रुपये आणि पुढील १० पानांसाठी (प्रति पान २ रुपये) २० रुपये, असा अवघा १२० रुपये खर्च येतो.
बचत: एका दस्तामागे नागरिकांचे तब्बल ६३० रुपये वाचणार आहेत.
सुरक्षित, पारदर्शक आणि २४ तास सेवा
ही प्रणाली पूर्णपणे डिजिटल, सुरक्षित आणि पारदर्शक असून नागरिकांसाठी दिवस-रात्र २४ तास उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी नागरिकांनी विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ८८८८००७७७७ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी संदीप आहेर यांनी केले आहे.