नाशिक महापालिकेची महासभा गाजणार... या प्रस्तावांवर होणार घमासान चर्चा...

Share:
Main Image
Last updated: 13-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ सप्टेंबर - नाशिक महानगरपालिकेची बहुप्रतिक्षित महासभा बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या महासभेच्या पुरवणी कार्यपत्रिकेत महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानापासून ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या चौकशीपर्यंत आणि प्रभाग विकास निधीत वाढ करण्याच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांचा समावेश करण्यात आला आहे.

मनपा कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचे दिवाळी अनुदान देण्याची मागणी

आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सर्व स्थायी, अस्थायी, मानधन, कंत्राटी कर्मचारी तसेच इतर पदांवर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना यंदा ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेते व सदस्यांनी मांडला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सीमा ठाकरे, भाजपचे गटनेते ॲड. श्याम बडोदे, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते आणि सदस्य सुधाकर बडगुजर यांच्या पत्रांचा समावेश आहे.

कुंभमेळा कामांची व 'वेस्ट टू वंडर पार्क'च्या चौकशीची मागणी

सिंहस्थ कामांची चौकशी: आगामी सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत 'स्वस्तिक इन्फ्रा' कंपनीमार्फत शहरात सुरू असलेल्या विविध कामांच्या चौकशीबाबतचा प्रस्ताव सदस्य ऐश्वर्या जयवंत जेजुरकर यांनी पटलावर आणला आहे.

वेस्ट टू वंडर पार्क: नवीन नाशिक विभागातील पाथर्डी शिवारातील पांडवलेणीच्या पायथ्याशी सुरू असलेल्या 'वेस्ट टू वंडर पार्क'च्या कामाची सखोल चौकशी करून सदर ठेका रद्द करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) गटनेते केशव सिताराम पोरजे यांनी केली आहे.

नगरसेवक स्वेच्छा निधीत वाढ व नगरसेवकांना लॅपटॉप

महापालिकेतील कामकाजाच्या सोयीसाठी १२२ नगरसेवकांना टॅब अथवा लॅपटॉप उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सदस्य भारती अंबादास ताजनपुरे यांनी दिला आहे. तसेच प्रभागातील विकासकामांसाठी दिला जाणारा 'प्रभाग विकास निधी' (नगरसेवक स्वेच्छा निधी) सध्याच्या ३८ लाख रुपयांवरून वाढवून थेट ६० लाख रुपये करण्यात यावा, अशीही मागणी ताजनपुरे यांनी प्रस्तावाद्वारे केली आहे.

Advertisement

रस्ते, ड्रेनेज, मदत आणि विविध नामांतरांचे प्रस्ताव

खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबास मदत: प्रभाग क्र. २५ मधील कु. केतन विजय बोरसे या बालकाचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाती मृत्यू झाल्याने, त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्या अपघात मदत योजनेअंतर्गत आर्थिक मदत मंजूर करण्याचा प्रस्ताव सुधाकर बडगुजर, साधना मटाले व सहकाऱ्यांनी मांडला आहे.

पायाभूत सुविधा: नवीन नाशिक प्रभाग क्र. २९ मध्ये विविध ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी ३०० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करणे (भूषण राणे) तसेच अशोका मार्ग ते छान हॉटेलपर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे (मंगला नन्नावरे) यांसारख्या विकासकामांचा समावेश आहे.

नामांतरण व अभिनंदन:

म्हसोबावाडी मार्गास 'मुख्यमंत्री वसंतराव नाईक म्हसोबावाडी मार्ग' नाव देणे.

जेल रोड परिसरातील चौकास 'कै. दिपक (काका) पंढरीनाथ पवार चौक' नाव देणे.

नवीन नाशिकमधील विविध परिसरांना 'सैनिक कॉलनी', 'श्रीराम नगर डेमसे मळा', 'विश्राम नगर' आणि कामटवाडे येथे 'नंदनवन कॉलनी' व 'स्व. विलास (आण्णा) पोपटराव मटाले उद्यान' अशी नावे देण्याचे प्रस्ताव आहेत.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका कुंदा बच्छाव यांच्या अभिनंदनाचा ठरावही सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

आगामी सणासुदीचे दिवस आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी पाहता, बुधवारच्या महासभेत या सर्व प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.