नाशिक शहरातील एसटी बसेसच्या वाहतुकीत मोठा बदल... तातडीने जाणून घ्या...

Share:
Main Image
Last updated: 12-Sep-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १२ सप्टेंबर - द्वारका भुयारी मार्ग प्रकल्पामुळे बंद असलेला द्वारका सर्कल परिसर आता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तसेच पंचवटीतील निमाणी बसस्थानक येथे लवकरच काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिक शहरातील एसटी बस वाहतूक अधिक गतिमान आणि सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने बस फेऱ्या आणि त्यांच्या मार्गांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर महत्त्वाचे बदल केले आहेत.  

पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी मोटार वाहन कायद्यान्वये ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. हे नवे बदल दि. १४ सप्टेंबर २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ या ८ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू राहणार आहेत.  

कोणत्या बसस्थानकावरून कोणत्या मार्गावरील बसेस सुटणार?

१) निमाणी बसस्थानक:

येवला, लासलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जिंतूर, बुलढाणा, लोणार आणि त्यामार्गे पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या.  

२) मेळा बसस्थानक:

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे (शिवाजीनगर), तसेच मालेगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जळगाव, चोपडा, धुळे, शिरपूर, शहादा, सुरत, वापी, इंदूर व पुढे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या फेऱ्या.  

३) नवीन सीबीएस (ठक्कर बाजार) बसस्थानक:

त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी परिसरातील ग्रामीण फेऱ्या; पालघर विभाग, त्र्यंबकेश्वर-पुणे; तसेच नंदुरबार, साक्री, सटाणा, वलसाड, कळवण, पेठ, सप्तशृंगी गड व सुरगाणा मार्गावरील वाहतूक.  

४) महामार्ग बसस्थानक:

शिर्डी / अहिल्यानगर तसेच कसारा / मुंबई मार्गावरील सर्व फेऱ्या.  

शहरांतर्गत असा असेल एसटी बसेसचा सुधारित मार्ग:

Advertisement

धुळे व जळगावकडे जाणाऱ्या बसेस (मेळा स्थानकातून):

मेळा बसस्थानक – जुनी जि.प. – खडकाळी सिग्नल – सारडा सर्कल – मदिना चौक – मुंबईनाका उड्डाणपुलाखालून – वडाळानाका – द्वारका – संतोष टी पॉईंट – स्वामीनारायण चौक – अमृतधाम – बळीमंदिर चौक (आडगाव) मार्गे पुढे जातील.

(परतीचा मार्ग याच मार्गाने त्र्यंबकनाका सिग्नलवरून मेळा बसस्थानकाकडे येईल.)  

पुणे (शिवाजीनगर) कडे जाणाऱ्या बसेस (मेळा स्थानकातून):

मेळा बसस्थानक – गडकरी सिग्नल – मुंबईनाका सर्कल – इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक – साईनाथ सिग्नल – रवीशंकर मार्ग – फेम सिग्नल – उपनगर – दत्तमंदिर सिग्नल – बिटको सिग्नल – सिन्नर फाटा मार्गे पुढे.

(परतीचा मार्ग सिन्नर फाटा – बिटको – सम्राट सिग्नल – डीजीपीनगर रोडने वडाळागाव – कलानगर – लेखानगर – इंदिरानगर बोगदा – मुंबईनाका – मेळा बसस्थानक असा राहील.)  

पेठ / कळवण / सप्तशृंगी गड बसेस (नवीन सीबीएसवरून):

नवीन सीबीएस – जुनी जि.प. – सारडा सर्कल – मदिना चौक – मुंबईनाका उड्डाणपुलाखालून – वडाळानाका – द्वारका – संतोष टी पॉईंट – निमाणी बसस्थानक – दिंडोरी नाका मार्गे पुढे रवाना होतील.  

मुंबई व शिर्डी बसेस (महामार्ग बसस्थानकातून):

मुंबईकडे जाणाऱ्या बसेस महामार्ग बसस्थानक – मुंबईनाका – इंदिरानगर बोगदा – लेखानगर – पाथर्डी फाटा – गरवारे पॉईंट मार्गे धावतील. शिर्डी/अहिल्यानगर बसेस फेम सिग्नल, उपनगर, बिटको व सिन्नर फाटामार्गे धावतील.  

८ दिवसांच्या अनुभवानंतर अंतिम निर्णय

सदर वाहतूक व्यवस्था १४ ते २१ सप्टेंबर दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार असून, या कालावधीत प्रवाशांचा प्रतिसाद व वाहतूक कोंडीचा अभ्यास करून पुढील मुदतवाढ अथवा आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. नियम मोडणाऱ्या एसटी चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाईचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.