नाशिक, (प्रतिनिधी) १७ जानेवारी - मतमोजणी केंद्रात मद्यधुंद अवस्थेत दाखल झालेल्या पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. मद्यार्क सेवनाची चाचणी घेत संबधीतावर अंबड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललीत सुभाष पाटील (रा.बडदेनगर,नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे. पाटील इगतपुरी पंचायत समिती येथे पुरवठा निरीक्षण अधिकारी पदावर कार्यरत आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी त्यांची नेमणुक करण्यात आली आहे. शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी (दि.१६) सर्वत्र मतमोजणी झाली. अश्विननगर येथील संभाजी स्टेडिअम येथे प्रभाग क्रमांक २७,२९ आणि ३१ ची मतमोजणी पार पडली. या वेळी पाटील मद्यधुंद अवस्थेत आढळून आले.
सार्वत्रिक निवडणूक वाहतुक व्यवस्थापन या कामासाठी त्यांची नेमणुक असतांना ते दारूच्या नशेत वावरतांना मिळून आले. ही बाब सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी विशाल गरूड यांच्या निदर्शनास येताच यांनी त्यास पोलीसांच्या स्वाधिन केले आहे. पथकाने पाटील यांची जिल्हारूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असून रक्ताचे नमुणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. याबाबत उपनिरीक्षक संदेश पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुह्याचा तपास जमादार हारून शेख करीत आहेत.
दुचाकी पार्क करण्यास विरोध; नागरिकाने घातला गोंधळ
नाशिक : मतदान केंद्र परिसरात दुचाकी पार्क करण्यास विरोध केल्याने एकाने आरडाओरड करीत गोंधळ घातल्याचा प्रकार नेहरू गार्डन भागात घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल संचेती असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिक महापालिका निवडणुक गुरूवारी (दि.१५) पार पडली. सकाळच्या सुमारास नेहरू गार्डन भागातील सारडा कन्या विद्यालय भागात हा प्रकार घडला. मतदानासाठी आलेल्या संशयिताने वाहनांसाठी १०० मिटर प्रवेश बंद असतांनाही आपली दुचाकी केंद्रपरिसरात लावली. यावेळी सुरक्षा यंत्रणेने त्यास दुचाकी बाहेर लावण्याचा सल्ला दिल्याने ही घटना घडली. संशयिताने आरडाओरड करीत गोंधळ घातला. याबाबत सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत