नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीत मिळणार इतके हजार बोनस...

Share:
Main Image
Last updated: 12-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर -  आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेतील सर्व स्थायी, अस्थायी, मानधन तत्त्वावरील, कंत्राटी कर्मचारी तसेच विविध विभागांतील अधिकाऱ्यांना ३१,००० रुपये (रु. ३१,०००/-) सानुग्रह अनुदान (बोनस) मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

संघटनेच्या वतीने मा. महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, उपायुक्त (प्रशासन), मुख्य लेखा अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्याकडे ही मागणी लावून धरण्यात आली असून, सदर प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.

वाढत्या महागाईमुळे सानुग्रह अनुदानात वाढीची मागणी

सध्याच्या काळात पेट्रोल, एलपीजी गॅस, खाद्यतेल यांसारख्या सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. महागाई निर्देशांकात झालेल्या या वाढीमुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सणासुदीच्या काळात हा खर्च आणखी वाढतो, ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३१ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळावे, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची मागणी:

महानगरपालिकेची ‘प्रिन्सिपल एम्प्लॉयर’ (मुख्य नियोक्ता) म्हणून ही जबाबदारी असून, महापालिकेशी संबंधित एकही कर्मचारी या अनुदानापासून वंचित राहू नये, असा पुनरुच्चार संघटनेने केला आहे. यात खालील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी आहे:

स्थायी व अस्थायी कर्मचारी: सर्व अधिकारी व कर्मचारी.

Advertisement

शिक्षण विभाग: शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कला, क्रीडा, कार्यानुभव अंशकालीन निदेशक.

मानधन व कंत्राटी कर्मचारी: अंगणवाडी कर्मचारी, उद्यान विभाग, अग्निशामक दल आणि पाणीपुरवठा विभागातील बुस्टर पम्पिंग कर्मचारी.

शासकीय योजनांतील कर्मचारी: NULM (राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान), समग्र शिक्षा अभियान, NUHM आणि राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत कार्यरत कर्मचारी.

ठेकेदार व देखभाल विभागातील कामगार: उद्यान, पाणीपुरवठा, मलनिसारण, सार्वजनिक बांधकाम विभागातील मक्तेदारांमार्फत काम करणारे कर्मचारी.

आरोग्य व स्वच्छता विभाग: घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी कर्मचारी, सार्वजनिक आरोग्य विभाग (मलेरिया/पेस्ट कंट्रोल) आणि पाणीपुरवठा विभागातील वॉलमन.

निवेदन देताना प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. सुधाकर (भाऊ) बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मा. आयुक्तांना सुपूर्द करण्यात आले.

या प्रसंगी उपाध्यक्ष नंदू गवळी, मनिषा पाटेकर, सरचिटणीस सोमनाथ कासार, रवींद्र येडेकर, तुषार ढकोलिया, अथर्व गवारे, आत्मज उपासणी, विजय जाधव, राकेश पवार, रणजित हंसराज, संगीता महाले, उज्ज्वला ठाकरे, लता पवार, जयश्री देवगिरे, भिमा देवरे, आशा मांडे, अश्विनी गायकवाड, छाया भिंगारदिवे, राणी रोकडे, बारकू शेलार, अविनाश पाटोळे, राहुल पाटील यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी व वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Advertisement

Comments

No comments yet.