नाशिक, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर - हातावर ५०० रुपयांच्या नोटा ठेवून आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत फुंकर मारून ६८ वर्षीय वृद्ध महिलेला संमोहित करत सुमारे ४२ हजार ३९० रुपयांचे सोन्याचे अलंकार हातोहात लांबविल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड भागात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हातावर नोटा ठेवल्या अन् तोंडावर मारली फुंकर!
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली गावातील पंजाब गल्ली, मालधक्का रोड परिसरात राहणाऱ्या अनिता अनिल मोरे (वय ६८) या शुक्रवारी (दि. ११) देवळाली गावातून बिटको चौकाच्या दिशेने पायी जात होत्या. यादरम्यान रस्त्यात दोन भामट्यांनी त्यांना गाठले.
यातील एका संशयिताने आपण फार मोठे नामांकित 'बाबा' असल्याचे सांगत अनिता मोरे यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराने महिलेच्या हातावर ५०० रुपयांच्या काही नोटा ठेवल्या.
पर्समध्ये दागिने टाकायला लावून मारली धूम!
मोरे यांना काही समजण्याच्या आतच संशयित भोंदू बाबाने त्यांचा हात हातात घेऊन काहीतरी मंत्र पुटपुटत त्यांच्या तोंडावर फुंकर मारली. त्याच वेळी दुसऱ्या साथीदाराने मोरे यांच्या हातातील नोटा काढून स्वतःच्या खिशात टाकल्या. महिला पूर्णपणे संमोहित झाल्याची खात्री पटताच, भामट्यांनी त्यांच्या अंगावरील ४२ हजार ३९० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून स्वतःच्या पर्समध्ये टाकण्यास भाग पाडले.
अलंकार पर्समध्ये जमा होताच दोन्ही भामट्यांनी तिथून पोबारा केला. काही वेळाने संमोहाचा प्रभाव ओसरल्यानंतर आणि शुद्धीवर आल्यानंतर आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नाशिकरोड पोलीस ठा गाठून आपबिती सांगितली.
या प्रकरणी अनिता मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार शेख या भोंदू बाबांचा आणि त्यांच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.