नाशिक, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर - एमएनजीएलचे (MNGL) प्रलंबित गॅस बिल भरणे आणि मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील दोघांना तब्बल १९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: 'एपीके' फाईल डाउनलोड केली अन् ४.१५ लाख गमावले
पहिली घटना इंदिरानगर येथील गार्डन कॉलनी भागात घडली. येथील एका ४२ वर्षीय महिलेशी बुधवारी (दि. ९) सकाळी सायबर गुन्हेगारांनी संपर्क साधला. "तुमचे एमएनजीएल गॅस कनेक्शनचे बिल थकीत असून ते तातडीने न भरल्यास रात्रीतून गॅस पुरवठा खंडित केला जाईल," अशी धमकी भामट्यांनी व्हॉट्सॲप आणि प्रत्यक्ष कॉलद्वारे दिली.
महिलेने बिल भरण्याची तयारी दर्शवताच, संशयिताने तिच्या मोबाईलवर 'MNGL' नावाची एक 'APK File' (ॲपची लिंक) पाठवली. महिलेने ती लिंक ओपन करताच भामट्यांनी तिच्या ॲक्सिस बँकेच्या खात्याचा ताबा मिळवून, टप्प्याटप्प्याने ४ लाख १५ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग करून फसवणूक केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पुरी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
दुसरी घटना: डिजिटल अरेस्ट अन् तब्बल १५ लाखांची लुटालूट
दुसरी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ११ ते २७ ऑगस्ट दरम्यान सायबर गुन्हेगारांनी तक्रारदाराशी संपर्क साधला. "आम्ही दिल्ली क्राईम ब्रँचमधून बोलत आहोत. तुमच्या नावावर असलेल्या सिमकार्डचा वापर करून दिल्लीत बँक खाते उघडण्यात आले आहे. या खात्यातून मनी लाँड्रिंग, ड्रग्ज तस्करी आणि मानवी तस्करीचे तब्बल ६ कोटी ८० लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत," अशी भीती व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे घालण्यात आली.
या 'डिजिटल अरेस्ट'च्या भीतीपोटी तक्रारदार हवालदिल झाले. संशयितांनी तक्रारदारावर गुन्हा दाखल झाल्याचे सांगत, त्यांच्या संपूर्ण मालमत्तेची माहिती काढून घेतली. त्यानंतर केस मिटवण्यासाठी मुदत ठेवी (FD) मोडण्यास आणि घरातील दागिने बँकेत गहाण ठेवण्यास भाग पाडले. "चौकशी पूर्ण झाल्यावर तुमचे सर्व पैसे परत केले जातील," असे भासवून संशयितांनी आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या विविध खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करून घेत ते लंपास केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे अधिक तपास करत आहेत.