नाशिक, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर - सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी दिला जाणारा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचा प्रतिष्ठित ‘एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६’ नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ओमकार पवार यांना जाहीर झाला आहे. त्यांनी राबवलेल्या 'नवचेतना अभियान' आणि 'पोषणदूत' या अत्यंत प्रभावी उपक्रमांची दखल घेत राज्यभरातून त्यांची या पुरस्कारासाठी एकमेव निवड करण्यात आली आहे.
नवीन योजना किंवा अतिरिक्त निधीचा भार न टाकता, उपलब्ध शासकीय यंत्रणेच्या प्रभावी वापरातून गरजूंपर्यंत लाभ पोहोचवण्याचा ओमकार पवार यांचा प्रशासकीय दृष्टिकोन या यशाचे मुख्य सूत्र ठरला आहे.
१. 'नवचेतना अभियान': १.०६ लाख एकल महिलांचे सक्षमीकरण
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील एकल, विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटित अशा तब्बल १,०६,००० महिलांचे सर्वेक्षण करून त्यांचे मॅपिंग करण्यात आले.
आर्थिक बळ: ३७ बचत गट क्लस्टर्सना शून्य टक्के व्याजदराने १.१८ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले.
सामाजिक पुनर्वसन: तीन मोफत व जातिनिरपेक्ष वधू-वर मेळाव्यांतून ७ पुनर्विवाह घडवून आणले. तसेच, ९१५ ग्रामपंचायतींमध्ये 'सौभाग्य शपथपत्र' योजनेतून विधवांसंबंधीच्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचे ठराव मंजूर झाले.
शिक्षण व बालसंगोपन: ३१ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची उच्च शिक्षण शिष्यवृत्ती, ३२२ मुलींना सायकलींचे वितरण आणि बालसंगोपन योजनेतून १५,००६ बालकांना दरमहा २,२५० रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.
२. 'पोषणदूत': शासकीय निधीशिवाय ९८४ बालके कुपोषणातून बाहेर!
संकल्पना: ‘One Officer, One Child, One Promise, Zero Rupees’ या सूत्रावर हा उपक्रम आधारित आहे.
अंमलबजावणी: एका अधिकाऱ्यावर एका कुपोषित बालकाची जबाबदारी सोपवून आहार, औषधोपचार आणि लसीकरणाचा पाठपुरावा करण्यात आला.
निकाल: ट्रॅकिंग केलेल्या १,९५४ कुपोषित बालकांपैकी ९८४ बालके पूर्णपणे सामान्य स्थितीत आली आहेत, तर ६११ बालके तीव्र कुपोषणातून बाहेर पडली आहेत.
३. 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका'
विद्यार्थ्यांना गावातच अभ्यासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी कमी खर्चात ६४३ गावपातळीवरील अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत.
२१ सप्टेंबरला मुंबईत वितरण सोहळा
हा पुरस्कार सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:१० वाजता मंत्रालय ॲनेक्स (मुंबई) येथील परिषद सभागृहात प्रदान केला जाईल. IIPA महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते ओमकार पवार यांना हा सन्मान सोपवला जाणार आहे.