मनोहर शिंदे, (नाशिक) १२ सप्टेंबर - गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व उच्च दर्जाचे अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिक शहर आणि जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत नाशिक शहरातील द्वारका परिसर, रविवार कारंजा तसेच निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे धाडी टाकून लाखो रुपयांचा अनधिकृत, भेसळयुक्त व मुदत संपलेला अन्नसाठा जप्त करत कडक कारवाई करण्यात आली आहे.
१. द्वारका परिसरात पहाटे मोठी कारवाई: २,१५५ किलो बर्फी जप्त करून नष्ट
सणांच्या काळात मिठाईचा खप वाढत असल्याने गुजरातहून नाशिक शहरात अवैधरीत्या आणला जाणारा बनावट बर्फीचा मोठा साठा एफडीएने उघडकीस आणला.
कारवाईची वेळ व ठिकाण: ११ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे द्वारका परिसरात दोन खासगी बसमधून ही कारवाई करण्यात आली.
जप्त साठा: ५ लाख ५८ हजार २६७ रुपये मूल्याची २,१५५ किलोग्रॅम 'स्पेशल स्वीट बर्फी'.
नियमभंग: अस्वच्छ वातावरणात वाहतूक, विनापरवाना बसचा वापर आणि निर्धारित तापमानाच्या अटींचे पालन न केल्याने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत हा साठा जप्त करून तात्काळ नष्ट करण्यात आला.
मार्गदर्शन व पथक: सह आयुक्त (अन्न) मंगेश माने, सहायक आयुक्त विनोद धवड व संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड, सुहास मंडलिक, संकेत येलमामे, वैभव गर्दे, चेतन परदेशी, अक्षय गाडेकर, अश्विनी पाटील आणि ऋतुजा नवले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
२. निफाड तालुक्यातील कोल्ड स्टोरेजवर धाड: ३९.५८ लाखांचा फ्रोजन पल्प जप्त
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील 'आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्सपोर्ट' वर अचानक धाड टाकण्यात आली.
त्रुटी: पॅकिंगवर उत्पादनाची तारीख (Packing Date), वापरण्याची अंतिम मुदत (Use-by Date), पोषणमूल्ये आणि FSSAI परवाना क्रमांक गायब असल्याचे आढळले.
जप्त केलेला साठा (एकूण ६,४५७ किलोग्रॅम):
सीताफळ पल्प (Frozen Custard Apple Pulp): २,९९६ किलोग्रॅम
आंबा पल्प (Mango Pulp): १,७८० किलोग्रॅम
खजूर पेस्ट (Date Paste): ५,६८१ किलोग्रॅम
(एकूण किंमत: रु. ३९ लाख ५८ हजार)
सर्व साठ्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.
३. रविवार कारंजात २९८ किलो 'वेजिटेबल फॅट' जप्त
नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातील रविवार कारंजा परिसरात एफडीएने कारवाई करत एका व्यापाऱ्याकडून सुमारे २९८.४ किलोग्रॅम भेसळयुक्त वेजिटेबल फॅट (किंमत रु. १.२९ लाख) जप्त केले.
नाशिक विभागात १,३५६ ठिकाणांची तपासणी; एफडीएचा कडक इशारा
नाशिक विभागात एफडीएच्या पथकांनी आतापर्यंत १,३५६ आस्थापनांची तपासणी केली आहे. दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, खवा, मिठाई आणि मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.