पोस्ट ऑफिसमध्ये ६० हजारांची रोकड लांबवली... गर्दीचा फायदा घेत भामट्यांचा...

Share:
Main Image
Last updated: 11-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - पोस्ट कार्यालयात पेन्शनची रक्कम जमा करण्यासाठी आलेल्या एका ७४ वर्षीय वृद्ध ग्राहकाच्या पिशवीतील ६० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी हातोहात लांबवल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड येथील पोस्ट ऑफिसमध्ये घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश कुमार वर्मा (वय ७४, रा. एकलहरे रोड, सिन्नर फाटा) असे फसवणूक झालेल्या वृद्ध नागरिकाचे नाव आहे.

कॅश काउंटरवर गर्दी अन् हात साफ!

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कुमार वर्मा हे सेवानिवृत्त असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून ते दरमहा आपल्या पेन्शनची रक्कम पोस्ट खात्यात भरतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (११ तारखेला) दुपारी ते पेन्शनची रक्कम जमा करण्यासाठी नाशिकरोड येथील पोस्ट ऑफिसमध्ये गेले होते.

Advertisement

कॅश काउंटरवर निवृत्ती वेतन निधीमध्ये ५ हजार रुपये जमा करत असताना, काउंटरवरील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवीत अलगद हात टाकून बचत खात्यात जमा करण्यासाठी आणलेली ६० हजार रुपयांची रोकड लांबवली.

पाठीमागे उभ्या असलेल्या दोन महिलांवर संशय

काही वेळाने पिशवीतील पैसे गायब असल्याचे वर्मा यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. पैसे भरताना पाठीमागे उभ्या असलेल्या दोन अनोळखी संशयित महिलांनी ही चोरी केल्याचा संशय वर्मा यांनी आपल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे पोस्ट ऑफिस परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे हवालदार भामरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.