नाशिक शहरात मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ... डॉक्टरसह तरुणावर भयंकर हल्ला... सातपूर व म्हसरूळमध्ये गुन्हे दाखल...

Share:
Main Image
Last updated: 11-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - नाशिक शहरात क्षुल्लक कारणावरून नागरिकांना बेदम मारहाण आणि लुटमारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. मखमलाबाद परिसरात एका ७९ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरसह रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आली, ज्यात डॉक्टरचे दात तुटले; तर दुसऱ्या घटनेत सातपूरच्या बजरंगनगर भागात वेळ विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना: मखमलाबाद येथे डॉक्टरवर हल्ला, दात तुटले

मखमलाबाद बस स्टँड परिसरात क्लिनिक बंद करून घरी परतणाऱ्या एका ७९ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टराला आणि त्यांच्या रिक्षाचालकाला दोघा भामट्यांनी बेदम मारहाण केली.

काय घडले नेमके?

डॉ. जगदिश घोडेकर (वय ७९, रा. मानकर पेट्रोल पंपाजवळ, मखमलाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मखमलाबाद शिवारात त्यांचे क्लिनिक आहे. बुधवारी (९ तारखेला) रात्री नेहमीप्रमाणे क्लिनिक बंद करून ते दीपक तुपलोंढे यांच्या रिक्षातून घराकडे निघाल्या होते. मखमलाबाद बस स्टँडजवळ भाजीपाला खरेदीसाठी ते थांबले असता दोन अनोळखी तरुणांनी त्यांना गाठले. "रागाने का बघतो?" अशी विचारणा करत या भामट्यांनी डॉ. घोडेकर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

यावेळी रिक्षाचालक तुपलोंढे हे डॉक्टरांच्या मदतीला धावले असता, संशयितांनी त्यांनाही बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान डॉक्टरांना धक्का मारून खाली ढकलून दिल्याने त्यांचे दात तुटून ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर पुढील तपास करत आहेत.

Advertisement

दुसरी घटना: बजरंगनगर भागात वेळ विचारून तरुणाला लुटले

दुसऱ्या घटनेत काम आटोपून घराकडे पायी जाणाऱ्या एका मजुराला रस्त्यात अडवून मारहाण करत त्याच्या जवळील रोकड लुटल्याचा प्रकार सातपूर परिसरातील बजरंगनगर येथे घडला.

मोकळ्या मैदानात त्रिकुटाचा धुमाकूळ

अजय राजू पडघान (वय ३०, रा. पाटील पार्क, म्हाडा कॉलनी, चुंचाळे शिवार) या मजुराने याप्रकरणी सातपूर पोलिसांत तक्रार दिली आहे. सोमवारी (७ तारखेला) रात्री अजय काम आटोपून बजरंगनगर भागातून पायी घराकडे जात होता. हॉटेल अण्णाचा मळा समोरील मोकळ्या मैदानाजवळ बसलेल्या तीन जणांच्या टोळक्याने अजयला थांबवून "किती वाजले?" अशी विचारणा केली.

अजयने माझ्याकडे मोबाईल नाही असे सांगताच, संतप्त झालेल्या या त्रिकुटाने त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करत चोरट्यांनी अजयच्या खिशातील ७०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली अन् अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे तपास करत आहेत.

शहर आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.