नाशिक, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - देवदर्शनासाठी नाशिकमध्ये आलेल्या भाविकांच्या पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी १० हजारांच्या रोकडसह ८ लाख १५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि किमती वस्तू लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजदूत हॉटेल परिसरात गुरुवारी (१० तारखेला) दुपारी हा प्रकार घडला.
अजय अरुण रोकडे (रा. डोंबिवली, जि. ठाणे) यांनी याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नाश्त्यासाठी थांबले अन् कार फोडली
मिळालेल्या माहितीनुसार, रोकडे कुटुंब गुरुवारी देवदर्शनासाठी नाशिकला आले होते. दुपारी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाण्यापूर्वी ते नाश्ता करण्यासाठी ईदगाह मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ आपली कार (क्रमांक MH 12 UF 0992) पार्क करून जवळच असलेल्या राजदूत हॉटेलमध्ये गेले.
रोकडे कुटुंब नाश्ता करत असतानाच अज्ञात चोरट्यांनी संधी साधत कारच्या डाव्या बाजूच्या खिडकीची काच फोडली. चोरट्यांनी मागील सीटवर ठेवलेली हॅन्डबॅग हातोहात लांबवली.
८ लाख १५ हजारांचा मुद्देमाल लंपास
चोरट्यांनी लांबवलेल्या हॅन्डबॅगमध्ये १० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि एक महागडे मनगटी घड्याळ असा एकूण ८ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज होता. नाश्ता करून परतल्यानंतर कारची काच फुटलेली आणि बॅग गायब असल्याचे रोकडे यांच्या लक्षात आले.
या घटनेमुळे शहरात आलेल्या पर्यटकांच्या आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. एल. शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.