नाशिक, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - आगामी 'सिंहस्थ कुंभमेळा २०२७' च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहनांच्या पार्किंगची क्षमता वाढवण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने मोठे पाऊल उचलले आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत तात्पुरत्या वाहनतळांसाठी (Parking) आपल्या खासगी जागा उपलब्ध करून देण्यास इच्छुक जमीनमालक आणि पात्र संस्थांकडून लवकरच अधिकृत अर्ज मागविण्यात येणार आहेत.
याबाबतचे जाहीर प्रकटन लवकरच प्रसिद्ध केले जाणार असून, सविस्तर माहिती विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.
'या' प्रमुख मार्गांलगतच्या जागांना प्राधान्य
कुंभमेळ्यादरम्यान कोट्यवधी भाविक व त्यांची वाहने शहरात येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक पार्किंग व्यवस्थेला पूरक म्हणून शहराकडे येणाऱ्या प्रमुख ९ प्रवेशमार्गांवर आणि अंतर्गत मार्गांवर खासगी जागांचा विचार केला जात आहे:
प्रमुख मार्ग: गंगापूर रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, धुळे रोड, छत्रपती संभाजीनगर रोड, पुणे रोड, कश्यपी धरण रोड, मुंबई रोड आणि जव्हार रोड.
(टीप: ही ठिकाणे प्राथमिक असून वाहतूक गरजेनुसार बदलू शकतात.)
जागेसाठी काय आहेत प्रमुख अटी?
रस्ते जोडणी व मालकी हक्क: जागेला योग्य रस्ता जोडलेला असावा आणि जागेचा कायदेशीर ताबा किंवा मालकी हक्क स्पष्ट असावा.
निवडीचे निकष: जागेचे स्थान, क्षेत्रफळ, प्रमुख मार्गांशी संपर्क, सुरक्षितता आणि वापराची व्यवहार्यता पाहून प्राधिकरण जागेची निवड करेल.
संचालन व देखभाल स्वखर्चाने: निवड झालेल्या जागेवर तात्पुरते वाहनतळ विकसित करणे, त्यांचे संचालन (Operation) आणि देखभाल करणे ही जबाबदारी संबंधित जमीनमालकाची/संस्थेची स्वखर्चाने व स्वजोखमीवर असेल.
इच्छुकांसाठी आवाहन:
पात्रता निकष, सहभागाच्या अटी, अर्ज पद्धत आणि कालमर्यादा लवकरच अधिकृत जाहीर प्रकरणाद्वारे प्रसिद्ध केली जाईल. इच्छुकांनी कुंभमेळा प्राधिकरण तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांच्या संकेतस्थळावरील अद्ययावत माहितीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.