नाशिक, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - देवघरात पूजा करून दिवा लावत असताना साडीने पेट घेतल्याने गंभीर भाजलेल्या एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजीवनगर भागात घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेमलता आण्णासाहेब जोशी (वय ७६, रा. अनुपमा अपार्टमेंट, प्रथमेश पावभाजी समोर, राजीवनगर) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (४ तारखेला) सकाळी जोशी या नेहमीप्रमाणे घरातील देवघरात पूजा-अर्चा करत होत्या. पूजा करून दिवा लावत असताना पेटत्या दिव्याची वात अचानक त्यांच्या अंगावरील साडीवर पडली. साडीने क्षणात पेट घेतल्याने जोशी या अग्नितांडवात गंभीर भाजल्या.
घटना घडताच त्यांचे जावई संजय हरिदास यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या जोशी यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी (१० तारखेला) डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे राजीवनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे हवालदार टिळेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.