माजी सैनिकावर नाशिकरोड स्थानकावर प्राणघातक हल्ला...

Share:
Main Image
Last updated: 11-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - आर्मी कॅन्टीनमधून मुलीच्या वाढदिवसाचे सामान आणून दिले नाही या क्षुल्लक कारणावरून दोन संशयितांनी एका माजी सैनिकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड बसस्थानक परिसरात घडली आहे. या हल्ल्यात माजी सैनिक गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

सुदर्शन शंकर गोळेसर (रा. देवपूर, ता. सिन्नर) हे माजी सैनिक असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर दामू शिंदे आणि गणेश रवींद्र गुरव या दोन संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात संशयित ज्ञानेश्वर शिंदे याच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यानिमित्त शिंदे याने गोळेसर यांच्या मोठ्या भावामार्फत आर्मी कॅन्टीनमधून सामान आणून देण्याची विनंती केली होती. मात्र, वेळेअभावी गोळेसर यांना ते सामान आणता आले नाही. याच गोष्टीचा राग संशयितांच्या मनात होता.

Advertisement

दारूच्या पैशांवरून वाद अन् थेट हल्ला

गत २३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास माजी सैनिक गोळेसर हे आपल्या गावी देवपूर येथे जाण्यासाठी नाशिकरोड बसस्थानकात आले होते. त्यावेळी संशयित ज्ञानेश्वर शिंदे आणि गणेश गुरव यांनी त्यांना गाठले. सुरुवातीला संशयितांनी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली आणि त्यानंतर "वाढदिवसाचे सामान का आणून दिले नाही?" यावरून वाद उकरून काढला.

वाद वाढल्याने संतप्त झालेल्या दोन्ही संशयितांनी गोळेसर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. याचदरम्यान संशयितांनी लाकडी दांडक्याने थेट हल्ला चढवल्याने गोळेसर यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेनंतर जखमी माजी सैनिकावर उपचार सुरू असून, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे हवालदार पाटील या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.