बँक खात्यातून परस्पर लाखो लंपास... पंचवटी आणि देवळाली कॅम्प मधील प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 10-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० सप्टेंबर - बँक खात्याचा गोपनीय ऑनलाईन ॲक्सेस मिळवून सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील दोघांच्या बँक खात्यांमधून साडेचार लाख रुपयांची रोकड परस्पर लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प आणि पंचवटी पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना: किराणा दुकानदाराला ३.२३ लाखांचा फटका (देवळाली कॅम्प)

लहवित (जि. नाशिक) येथील रहिवासी व किराणा व्यावसायिक रामभाऊ कारभारी आहेर यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

सोमवारी (दि. ७) सकाळच्या सुमारास सायबर भामट्याने आहेर यांना कॉल करून बँकेशी संबंधित असल्याचे भासवले आणि त्यांच्या बँक खात्याचा गोपनीय ऑनलाईन ॲक्सेस मिळवला. यानंतर क्षणाचाही विलंब न लावता भामट्यांनी आहेर यांच्या खात्यातून ३ लाख २३ हजार २१८ रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वर्ग करून काढून घेतले. या प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील करत आहेत.

दुसरी घटना: युनियन बँकेच्या खात्यातून १.२५ लाख पार (पंचवटी)

दुसरी घटना पेठफाटा परिसरातील पंचवटी प्राईड (भक्तीधाम मागे) येथे राहणारे मुकेशभाई प्रमोदभाई ठक्कर यांच्याबाबत घडली.

संशयित सायबर भामट्यांनी २५ एप्रिल ते ४ मे या कालावधीत ठक्कर यांच्याशी संपर्क साधून युनियन बँक (दिंडोरी नाका शाखा) येथील त्यांच्या खात्याचा ऑनलाईन ॲक्सेस मिळवला. ॲक्सेस मिळताच भामट्यांनी त्यांच्या खात्यातून १ लाख २५ हजार रुपयांची रक्कम परस्पर लांबवली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ठक्कर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पवार या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.