गणेशोत्सवानिमित्त सरकारची मोठी घोषणा... राज्यभर होणार ही तपासणी...

Share:
Main Image
Last updated: 10-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) १० सप्टेंबर - श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत राज्यभरात तब्बल २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून ते महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामीण भागापर्यंत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मदतीने राज्यातील सुमारे १० हजार सार्वजनिक गणेश मंडळे, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि दात्यांच्या सहभागातून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबवला जात आहे.

‘डॉक्टर आपल्या दारी’: वेळेत निदानावर भर

नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणीची सुविधा मिळून आजारांचे वेळेत निदान व्हावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा: शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्गे आणि धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी या शिबिरांमध्ये सेवा देणार आहेत.

गंभीर आजारांची प्राथमिक तपासणी: हृदयरोग, किडनीचे विकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे गंभीर आजार आणि बालरोग यांसारख्या आजारांची मोफत तपासणी केली जाईल.

मोफत पुढील उपचार: तपासणीदरम्यान गंभीर आजार आढळल्यास संबंधित रुग्णांना पुढील उपचारासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व इतर शासकीय योजनांतर्गत मोफत उपचार मिळवून दिले जातील.

Advertisement

गेल्या वर्षीचा उदंड प्रतिसाद

मागील वर्षी २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान १२,६५५ आरोग्य शिबिरांमध्ये ७ लाख ४ हजार ७३ नागरिकांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला होता. त्यातील १८,८०० रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले होते. तसेच २३६ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून १६,७९८ नागरिकांनी रक्तदान केले होते. या अभूतपूर्व प्रतिसादानंतर यंदा २० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील या उपक्रमातून यंदा २० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष्य आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे औचित्य साधून नागरिकांनी आपल्या परिसरातील या शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा."

— रामेश्वर नाईक, प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ - २०२६

एकूण उद्दिष्ट: २० हजार आरोग्य शिबिरे | २० लाखांहून अधिक नागरिक

व्याप्ती: राज्यातील सर्व ३६ जिल्हे

सहभाग: १० हजार सार्वजनिक गणेश मंडळे व सामाजिक संस्था

Advertisement

Comments

No comments yet.