नाशिक, (प्रतिनिधी) १० सप्टेंबर - शहरात पुन्हा एकदा बेकायदा सावकारीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आर्थिक व्यवहारातून एका सावकाराने कर्जदाराला भररस्त्यात गाठून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पंचवटी परिसरात घडली आहे. 'पैसे दिले नाही तर जीवे ठार मारू' अशी धमकी दिल्याने जखमी कर्जदाराने पंचवटी पोलिसांत धाव घेतली असून, संशयितावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० टक्के दराने वसुली, तरीही तगादा सुरूच
विनोद दशरथ शिंदे (वय ५५, रा. अमृतधाम, पंचवटी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी क्षितीज प्रमोद जामनेरकर (रा. आयोध्यानगरी, अमृतधाम) यांनी फिर्याद दिली आहे. जामनेरकर हे प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आर्थिक अडचण निर्माण झाल्याने त्यांनी संशयित विनोद शिंदे याच्याकडून काही रक्कम उसने घेतली होती. संशयिताकडे कोणताही सावकारी परवाना नसताना त्याने जामनेरकर यांच्याकडून दरमहा तब्बल १० टक्के व्याजदराने वसुली सुरू ठेवली. जामनेरकर यांनी मुद्दलासह सुमारे ४२ हजार रुपये रोख व्याजापोटी अदा केले असतानाही संशयिताकडून पैशांसाठी सतत तगादा सुरू होता.
बिअर शॉपजवळ भररस्त्यात गाठून मारहाण
मंगळवारी (दि. ८) जामनेरकर हे पंचवटीतील 'चिअर्स बिअर शॉप' परिसरात असताना संशयित शिंदे याने त्यांना गाठले. तेथे त्याने पैशांवरून वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जामनेरकर यांनी परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, संशयिताने त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जामनेरकर यांच्या छातीला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली.
पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल
भररस्त्यात घडलेल्या या प्रकारानंतर संशयिताने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने जामनेरकर यांनी थेट पंचवटी पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून संशयित विनोद शिंदे याच्याविरुद्ध मारहाण, धमकी आणि बेकायदा सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव करत आहेत.