१५ कोटींच्या पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवणारा भोंदू बाबा गजाआड...

Share:
Main Image
Last updated: 10-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० सप्टेंबर - मंत्र-तंत्र आणि पूजाविधी करून तब्बल १५ कोटी रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबासह त्याच्या साथीदारांवर अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) मदतीने हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी मुख्य भोंदू बाबा आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

चमत्काराचा बनाव अन् लाखो रुपयांची लूट

मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी राजाराम सिताराम शेलार आणि त्यांच्या मित्रांना हिराचंद शिवाजी बर्डे या भोंदू बाबाबाबत माहिती मिळाली होती. हा बाबा पैशांचा पाऊस पाडतो असा दावा करण्यात आला होता. सुरुवातीला प्रत्येकी १,००० रुपये घेऊन भोंदूने पूजाविधीच्या बहाण्याने २ लाख रुपये प्रकट केल्याचा बनाव रचला. हा तथाकथित चमत्कार पाहून पीडितांचा त्याच्यावर विश्वास बसला.

त्यानंतर "पाच जणांनी मिळून ११ लाख रुपये दिल्यास १५ कोटी रुपयांचा पाऊस पाडून देईन," असे सांगून भोंदूने पीडितांकडून वेळोवेळी रोख व ऑनलाइन स्वरूपात १० लाख ९५ हजार रुपये उकळले.

नारळाचा स्फोट अन् मुलांच्या खेळण्यातील खोट्या नोटा

पूजाविधीदरम्यान भोंदूने पीडितांच्या हातात तांदूळ, अगरबत्ती व नारळ देऊन मंत्रोपचार सुरू केले. त्याच वेळी नारळात अचानक स्फोट घडवून आणून चमत्कार झाल्याचा भास निर्माण केला. त्यानंतर ३ कोटी रुपयांचा पाऊस पडल्याचे सांगत नोटांनी भरलेली एक गोणी पीडितांच्या हवाली केली.

"ही गोणी घरी नेऊन सात दिवस पूजा करा, त्याआधी उघडल्यास तुमच्यावर कोप होईल," अशी भीती भोंदूने दाखवली. मात्र, काही दिवसांनंतर शंका आल्याने पीडितांनी ती गोणी उघडून पाहिली असता, नोटांच्या बंडलमध्ये फक्त पहिली नोट खरी आणि उरलेल्या सर्व नोटा लहान मुलांच्या खेळण्यांमधील खोट्या नोटा असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

स्मशानात पूजेची अट अन् जीवे मारण्याची धमकी

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी भोंदू बाबाकडे पैशांची मागणी केली. त्यावर भोंदूने “अमावास्येच्या रात्री कपडे काढून स्मशानात पूजा करावी लागेल” अशी अजब अट घातली. पीडितांनी यास नकार देत पैसे परत मागितले असता, भोंदूने त्यांना गायब करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

‘अंनिस’च्या तत्परतेने पोलिसात धाव अन् कारवाई

घाबरलेल्या पीडितांनी तत्काळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे आणि राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडितांनी अभोणा पोलीस ठाणे गाठले.

प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत मुख्य भोंदू हिराचंद बर्डे याच्यासह सहा साथीदारांविरोधात जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुख्य आरोपी भोंदू आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक केली आहे.

आवाहन:

सदर भोंदू बाबाने अशाच प्रकारे अन्य कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी न घाबरता अभोणा पोलीस ठाण्याशी किंवा महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: कृष्णा चांदगुडे (मो. ९८२२६३०३७८)

Advertisement

Comments

No comments yet.