परीक्षा नाही, थेट मुलाखतीद्वारे भरती... असा घ्या संधीचा लाभ...

Share:
Main Image
Last updated: 10-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० सप्टेंबर - भारतीय डाक विभागाच्या टपाल जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनांसाठी विमा एजंट (Direct Agent) म्हणून नियुक्ती करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार तसेच सध्या कार्यरत केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी दि. २३ व २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वरिष्ठ डाक अधीक्षक, नाशिक विभाग यांच्या कार्यालयात, बी. डी. भालकेर शाळेसमोर, एन. डी. पटेल रोड, नाशिक – ४२२००१ येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह ३ पासपोर्ट आकाराचे फोटो, पॅनकार्ड व आधारकार्ड घेऊन स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पात्रता व अटी

उमेदवार इयत्ता १० वी अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. संगणकाचे व स्थानिक ठिकाणाचे ज्ञान असावे. उमेदवार सध्या कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा.

Advertisement

उत्तीर्ण उमेदवारास रु. ५,०००/- चे राष्ट्रीय बचत पत्र (NSC) ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ स्वरूपात भरणे बंधनकारक राहील.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात येईल. आवश्यक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर परवाना कायम करण्यात येईल व तो ५ वर्षांसाठी वैध राहील.

उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, परस्पर संवाद कौशल्य आणि जीवन विम्याबाबतचे ज्ञान या निकषांच्या आधारे केली जाईल.

केंद्र सरकारी/राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ते सरकारी कर्मचारी असल्याचे ओळखपत्र तसेच संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचारी CPC-Level 8 च्या खालील स्तरावर असणे आवश्यक आहे.

बेरोजगार/स्वयंरोजगारातील तरुण, सेवानिवृत्त सैनिक, पूर्वी विमा प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्ती, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्य, निवृत्त शिक्षक, बचत गट प्रतिनिधी तसेच वरील अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनाही या संधीचा लाभ घेता येणार आहे.

अधिक माहितीसाठी वरिष्ठ डाक अधीक्षक, नाशिक विभाग यांच्या कार्यालयाशी तसेच जवळच्या कोणत्याही डाक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ डाक अधीक्षक, नाशिक डाक विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.