मनोहर शिंदे, (नाशिक) १० सप्टेंबर - नाशिक शहरातील निमाणी बसस्थानकाच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने, तिथून सुटणाऱ्या बहुतांश एसटी बसेसच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बसफेर वगळता इतर मार्गांवरील बसेस आता मेळा बसस्थानक, नवीन सीबीएस (CBS) आणि महामार्ग बसस्थानकातून सुटणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार (ता. १२) पासून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने पोलीस प्रशासनाशी चर्चा करून हे सुधारित नियोजन निश्चित केले आहे. काँक्रीटीकरणाच्या कामामुळे प्रवाशांची अडचण होऊ नये, यासाठी निमाणी बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसेस शहरातल्या इतर तीन प्रमुख बसस्थानकांवर विभागण्यात आल्या आहेत.
कोणती बस कुठून सुटणार? (सुधारित नियमावली)
मेळा बसस्थानक:
मालेगाव, धुळे, जळगाव, चोपडा, शिरपूर, शहादा, चाळीसगाव, शिंदखेडा तसेच पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा मार्गावरील आणि पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या.
नवीन सीबीएस बसस्थानक:
सटाणा, साक्री, नंदुरबार, नवापूर, पेठ, सुरगाणा, कळवण, सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पिंपळगाव, हरसूल आणि ओझरकडे जाणाऱ्या बस.
महामार्ग बसस्थानक:
शिर्डी व मुंबई महामार्गावरील सर्व फेऱ्या; तसेच अहिल्यानगर, वापी, वलसाड, सुरत आणि पुढे जाणाऱ्या बसफेर.
निमाणी बसस्थानक (सध्याचा मार्ग कायम):
निफाड, येवला तसेच छत्रपती संभाजीनगर मार्गे पुढे जाणाऱ्या सर्व बसेस पूर्ववत निमाणी बसस्थानकातूनच सुटतील.
प्रवाशांना आवाहन:
छत्रपती संभाजीनगर मार्ग वगळता अन्य मार्गांवरील बसेस आता त्यांच्या नवीन निश्चित केलेल्या बसस्थानकांवरूनच सुटणार आहेत. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या मार्गावरील बस कुठून सुटणार आहे, याची खात्री करूनच नियोजन करावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.