नाशकातील धक्कादायक प्रकार... रोडरोमियोच्या जाचाला कंटाळून तरुणीने स्वतःला घरात कोंडले... इन्स्टाग्राम व्हिडिओनंतर...

Share:
Main Image
Last updated: 09-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ सप्टेंबर - शहरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचा मानसिक छळ करत तिचा पाठलाग करणाऱ्या एका रोडरोमियोचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताच्या सततच्या जाचाला आणि भीतीला कंटाळून या तरुणीने स्वतःला दोन दिवस घरात कोंडून घेतले होते. अखेर तरुणीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली आपबिती मांडल्यानंतर सातपूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शुभम बोदले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

काय आहे नेमकी घटना?

ई-मेल आणि अश्लील मेसेजने सुरुवात: गेल्या महिन्यात संशयित शुभम बोदले याने सातपूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणीशी ई-मेलद्वारे संपर्क साधून तिला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तरुणीने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.

Advertisement

क्रेटा कारने पाठलाग: तरुणीने दुर्लक्ष केल्यानंतर संशयिताने थेट तिच्या घराच्या परिसरात क्रेटा कारने येऊन तिला समतानगर येथील एका कॅफेत भेटण्यासाठी दबाव आणला. तरुणीने नकार दिला असता, त्याने दररोज तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

दोन दिवस स्वतःला कोंडले: घाबरलेल्या तरुणीने आपला येण्या-जाण्याचा मार्ग बदलला, तरीही संशयिताने तिचा पिच्छा सोडला नाही. एकदा तर त्याने बुद्धविहार बोर्डाजवळ फुलगुच्छ ठेवून तो घेण्यास तरुणीला भाग पाडले. या सततच्या त्रासाला कंटाळून भयभीत झालेल्या तरुणीने स्वतःला सलग दोन दिवस घरात कोंडून घेतले होते.

सोशल मीडियावर भांडाफोड: स्वतःला घरात कोंडून घेतल्यानंतरही संशयित क्रेटा कार घेऊन तिच्या घराभोवती चकरा मारत होता. अखेर या भयानक त्रासाला कंटाळून तरुणीने आपल्या व्यथेचा एक व्हिडिओ तयार करून तो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

पोलीस प्रशासनाकडून तत्पर कारवाई:

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच सातपूर पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेतली. पोलिसांनी थेट तरुणीचे घर गाठून तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि आरोपी शुभम बोदलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस ई-मेल आयडी आणि क्रेटा कारच्या क्रमांकाच्या आधारे संशयिताचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रौंदळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.