निवृत्तीवेतनधारकांसाठी खूशखबर... नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात या आणि हा लाभ घ्या...

Share:
Main Image
Last updated: 09-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ सप्टेंबर - राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाविरोधातील विविध सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभतेने मिळाव्यात यासाठी शासनाने 'महा-उपलब्धी' (Maha-UPLABDHI) हे अधिकृत मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या प्रत्यक्ष वापराबाबत निवृत्तीवेतनधारकांसाठी गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकचे वरिष्ठ कोषागार अधिकारी सचिन धस यांनी या कार्यशाळेबाबत माहिती देत जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

घरबसल्या मिळणार विविध सेवा व प्रमाणपत्रे

'महा-उपलब्धी' मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना आता शासकीय कार्यालयांचे खेटे मारण्याची गरज उरणार नाही. या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारक घरबसल्या पुढील सुविधांचा लाभ पीडीएफ (PDF) स्वरूपात मिळवू शकतील:

मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा सविस्तर तपशील

उत्पन्नाचा दाखला

प्राप्तिकरासाठी लागणारा फॉर्म क्रमांक १६ (Form 16)

Advertisement

निवृत्तीवेतनविषयक महत्त्वाचे शासन निर्णय (GR)

कार्यशाळेला येताना 'या' गोष्टी सोबत आणाव्यात

कार्यशाळेमध्ये उपस्थित निवृत्तीवेतनधारकांना ॲप डाऊनलोड करण्यापासून ते त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे या कार्यशाळेस येताना जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी खालील गोष्टी आवर्जून सोबत आणाव्यात:

१. पीपीओ क्रमांक (PPO Number)

२. बँक खाते क्रमांक

३. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक (Registered Mobile Number)

४. अँड्रॉइड/स्मार्टफोन

निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शक कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी सचिन धस यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.