नाशिक, (प्रतिनिधी) ८ सप्टेंबर - "माझ्या भावासोबत का राहतोस?" असा जाब विचारत पोलीस दप्तरी नोंद असलेल्या सराईत गुन्हेगाराने एका २४ वर्षीय तरुणावर चॉपरने वार करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवल्याची गंभीर घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
लालसाई सोसायटी (छापरा हॉल समोर) येथे राहणारा नवेद हर्शद मिर्झा (२४) हा तरुण सोमवारी (दि. ६) रात्री आपल्या घर परिसरातून मोबाईलवर बोलत पायी जात होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्याला रस्त्यात अडवले.
"तू आमचा भाऊ अमिर खान याच्यासोबत का राहतोस?" असा जाब विचारत संशयितांनी नवेदला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मुजिब खान उर्फ मुज्जू खान याने स्वतःजवळील चॉपरने नवेदच्या हातावर थेट वार केले.
१० ग्रॅमची सोनसाखळी लांबवून पोबारा
चॉपरच्या हल्ल्यात नवेद जखमी झाल्यानंतर, संशयितांनी त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी बळजबरीने ओरबाडून घटनास्थळावरून पळ काढला.
गुन्हा दाखल व आरोपींची नावे:
संशयित आरोपी: मुजिब खान उर्फ मुज्जू खान (३०, रा. डेव्हलपमेंट एरिया - सराईत गुन्हेगार) आणि शाहबाज नावाचा तरुण.
पोलीस कारवाई: जखमी नवेद मिर्झाच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलिसांत लुटमारीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक पाडेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.