८० हजारांचा 'सॅमसंग फोल्ड ६' मोबाईल हडपला... मित्रानेच लावली अशी विल्हेवाट...

Share:
Main Image
Last updated: 08-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ सप्टेंबर - विक्रीसाठी दिलेल्या तब्बल ८० हजार रुपयांच्या महागड्या मोबाईलचा एका भामट्याने अपहार करून परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार वडाळा-पाथर्डी रोड परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मखमलाबाद रोड येथील समर्थ नगरमध्ये राहणारे शेखर लक्ष्मण पवार यांनी दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेला 'सॅमसंग फोल्ड ६' (Samsung Fold 6) हा महागडा मोबाईल त्यांना विकायचा होता. यासाठी त्यांनी त्यांचा परिचित असलेला संशयित शुभम उर्फ अनिकेत रावसाहेब गरुड (२५, रा. कोयना कॉलनी, नारायण बापू नगर, जेलरोड) याच्याशी संपर्क साधला.

Advertisement

संशयित अनिकेत याने मोबाईल चांगल्या किमतीत विकून देण्याची ग्वाही दिली. त्यावर विश्वास ठेवून पवार यांनी २२ सप्टेंबर रोजी वडाळा-पाथर्डी रोडवरील साईनाथ नगर येथील 'कार्तिक पार्सल पॉईंट' येथे जाऊन ८० हजार रुपये किमतीचा मोबाईल त्याच्या स्वाधीन केला.

तगादा लावताच समोर आला प्रकार

मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर संशयिताने तो विक्री केला नाही आणि पवार यांना त्याचे पैसेही दिले नाहीत. संशयित सतत टाळाटाळ करत असल्याने पवार यांनी त्याच्याकडे मोबाईल आणि पैशांसाठी तगादा लावला. यानंतर संशयिताने त्या महागड्या मोबाईलची परस्पर विल्हेवाट लावल्याचे उघड झाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेखर पवार यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित शुभम उर्फ अनिकेत गरुड याच्याविरोधात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार म्हैसधुणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.