साधूच्या वेशात आलेली भामट्यांची टोळी गजाआड... ४५ सीसीटीव्हीद्वारे ओझर पोलिसांची कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 08-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ सप्टेंबर - जिल्ह्यातील ओझर परिसरात साधूच्या वेशात येऊन भुरळ (संमोहन) पाडत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका भामट्या टोळीचा ओझर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ओझर येथील एका प्रसिद्ध मिठाई दुकानदाराला साधूच्या वेशात आलेल्या दोघांनी भुरळ घालून त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या होत्या. या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी तब्बल ४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून दोन्ही आरोपींना थेट मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरून मुसक्या आवळल्या आहेत.

नेमकी काय घडली घटना?

ओझर येथील पंचवटी गणेश मंदिराजवळ असलेल्या 'निर्मल स्वीट्स'चे चालक राकेश शिवप्रसाद शर्मा हे आपल्या दुकानात असताना नागा साधूच्या वेशात दोन व्यक्ती तेथे आल्या. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात साधू-संतांची आवक वाढलेली असताना, या भामट्यांनी शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांना बोलण्यात गुंतवले.

साधूच्या वेशात आलेल्या या दोघांनी शर्मा यांच्यावर संमोहन (भुरळ) टाकून त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेतल्या आणि तेथून पळ काढला. काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे शर्मा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ ओझर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तब्बल ४५ CCTV आणि मध्य प्रदेशात थरारक कारवाई

Advertisement

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ओझर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यासाठी ओझर, नाशिक आणि महामार्गावरील तब्बल ४५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

सीसीटीव्हीच्या आधारे तपासाची साखळी जोडत पोलीस पथकाने थेट मध्य प्रदेश गाठले.

मध्य प्रदेशातील 'खलघाट' परिसरात नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरून दोन्ही आरोपींना ओझर पोलिसांनी ताब्यात घेतले.

२ लाख ८० हजारांचे वितळवलेले सोने जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी २ लाख ८० हजार रुपये किमतीचे वितळवलेले सोने जप्त केले आहे. आरोपींना नाशिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने महाराष्ट्रात आणि बाहेर अशाच प्रकारे आणखी किती लोकांना गंडा घातला आहे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.