दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ८ सप्टेंबर - आगामी 'सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७' च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन आणि धार्मिक महत्त्वाला नवी ओळख देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गौतमी गोदावरी धरण परिसरातील एका बेटावर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या 'श्री त्र्यंबकराजांची' भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १७ कोटी ३४ लाख ९० हजार रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्या नियोजनातून हा प्रकल्प साकार होत आहे.
निधीचे वितरण आणि प्रमुख कामे:
श्री त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारणे: ₹९ कोटी ९८ लाख
प्रतिकृती सभोवतालचा परिसर विकास: ₹५ कोटी ४१ लाख
विद्युत व्यवस्था आणि रोषणाई: ₹१ कोटी ९४ लाख
या कामांसाठी पाटबंधारे विभागामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
पर्यटन, रोजगार आणि दीर्घकालीन फायदा:
आंतरराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू: कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून आणि परदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी ही प्रतिकृती एक प्रमुख आकर्षण ठरेल.
स्थानिक रोजगाराला चालना: या प्रकल्पामुळे त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटन वाढेल, ज्याचा थेट फायदा स्थानिक हॉटेल व्यवसाय, वाहतूक, हस्तकला आणि बाजारपेठेला होऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
दीर्घकालीन उपयोग: कुंभमेळ्यानंतरही या पायाभूत सुविधांमुळे त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला सातत्याने गती मिळत राहील.