नाशिक, (प्रतिनिधी) ८ सप्टेंबर - बांधकाम कंत्राटातील कमिशनच्या वादातून एका ५४ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाला अडवून टोळक्याने बेदम मारहाण केल्याची आणि त्यांच्याकडील लाखो रुपयांचा ऐवज लुटून खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोडवरील आदित्य ज्वेलर्सजवळ घडली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात ऋषिकेश चौधरी, विकी ढोले आणि त्यांच्या १२ ते १४ साथीदारांविरोधात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
धात्रक फाटा, पंचवटी येथील रहिवासी आणि बांधकाम व्यावसायिक भरत रामदास सोनवणे (वय ५४) हे रविवारी (६ सप्टेंबर) रात्री ९:२० वाजेच्या सुमारास गंगापूर नाक्यावरील आदित्य ज्वेलर्सजवळून जात होते. त्यावेळी संशयित आरोपी ऋषिकेश चौधरी आणि विकी ढोले हे आपल्या १२ ते १४ साथीदारांसह वाहनांमधून त्या ठिकाणी आले.
फिर्यादी सोनवणे यांचे व्यावसायिक भागीदार शरद देवरे यांनी कंत्राटातील कमिशनचे पैसे दिले नाहीत, या कारणावरून संशयितांनी सोनवणे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि संशयितांनी सोनवणे यांना लाथाबुक्क्यांनी व हातापायांनी बेदम मारहाण केली.
लाखोंचा ऐवज लुटला, खंडणीची मागणी
मारहाणीदरम्यान आरोपींनी सोनवणे यांच्या गळ्यातील ४ लाख रुपये किमतीची ६० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (चैन) आणि ४२ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता, कंत्राटाच्या पैशांमधून मिळणाऱ्या कमिशनच्या नावाने सोनवणे यांच्याकडे खंडणीची मागणीही केली.
गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
या हल्ल्यानंतर भरत सोनवणे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी (७ सप्टेंबर) दुपारी ५:१५ वाजेच्या सुमारास गुन्हा रजिस्टर नंबर २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ११९(१), १८९(२), १९१(१), १९१(२), ३५१(२), ३५१(४) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार गांगोडे (बॅज क्र. १७४४) यांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरातील वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या जबरी चोरी आणि खंडणीच्या घटनेमुळे शहरभरात खळबळ उडाली आहे.