नाशिक, (प्रतिनिधी) ७ सप्टेंबर - शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने धडक कारवाई केली आहे. सिडकोतील राजरत्न नगर परिसरात सापळा रचून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीची दुचाकी व मोबाईल असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
नाशिक शहर परिसरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला प्रतिबंधात्मक उपाययोजना व कारवाईचे कडक आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२ चे अधिकारी व कर्मचारी संशयितांचा शोध घेत असताना, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व वाल्मिक चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. एका इसमाकडे चोरीची मोटारसायकल असून तो सिडकोतील राजरत्न नगर परिसरात उभा असल्याची खात्रीशीर खबर मिळताच युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने राजरत्न नगर येथे सापळा लावला.
संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो अल्पवयीन (विधीसंघर्षित बालक) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लागलीच त्याच्या पालकांना घटनास्थळी पाचारण केले. पालकांच्या समक्ष वाहनाबाबत कसून विचारपूस केली असता, त्याने पवननगर स्टेडियम जवळून सदर मोटारसायकल आणि मोबाईल चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी संशयिताकडून ४० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल आणि १५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अंबड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये दाखल असलेला गुन्हा (गु.र.नं. ६८४/२०२६) उघडकीस आला आहे.
ही धडक कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोउनि मुक्तारखान पठाण, सपोउनि गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, पोहवा चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, मनोज शिंदे, तेजस मते आणि चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने केली.