नाशिककरांनो सावधान... तोतया पोलिसांनी असे लांबवले ६ लाखांचे सोने...

Share:
Main Image
Last updated: 07-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ सप्टेंबर - नाशिकरोड आणि परिसर सध्या चोरटे आणि भामट्यांच्या रडारवर असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरात तोतया पोलिसांचा सुळसुळाट वाढला असून, नाशिकरोड भागात एका ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकाची वाट अडवून भामट्यांनी तब्बल ६ लाख रुपयांचे दागिने लांबवले. तर दुसऱ्या घटनेत जेलरोड भागात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

पहिली घटना: 'तोतया' पोलिसांकडून वृद्धाला ६ लाखांचा गंडा

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तमंदिर रोड भागात राहणारे ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक दिलीप कचरदास संकलेचा (वय ६८, रा. स्नेह मंदिर सोसायटी) हे रविवारी (दि. ६) सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. सकाळी परिसरातील सुराणा हॉस्पिटलसमोरून ते घराकडे परतत असताना, एका दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांना गाठले.

"या भागात सध्या मोठ्या प्रमाणावर चैन स्नॅचिंग (सोने चोरी) होत आहे, तुम्ही दागिने उघडे ठेवून का फिरता?" अशी बतावणी तोतया पोलिसांनी संकलेचा यांच्याकडे केली. त्यांनी संकलेचा यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि हातातील सोन्याची हिरेजडीत अंगठी सुरक्षेचे कारण सांगून एका कागदात बांधून देण्याचे नाटक केले. मदतीचा हात दाखवण्याच्या बहाण्याने भामट्यांनी नजरचुकवून सुमारे ६ लाख रुपये किमतीचे हे अलंकार हातोहात लांबवले. संकलेचा यांनी घरी जाऊन कागदाची पुडी उघडली असता आत दागिने नसल्याचे पाहून त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

Advertisement

दुसरी घटना: जेलरोड भागात पायी जाणाऱ्या महिलेचे दागिने हिसकावले

दुसरी घटना नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेलरोड येथील नरहरीनगर परिसरात घडली. सुवर्णनगर भागात राहणाऱ्या भारती खंडेराव नाथे (वय ६०) या शनिवारी (दि. ५) रात्री आठ वाजेच्या सुमारास नरहरीनगर येथील आपल्या भावाच्या घराकडून स्वतःच्या घरी परतत होत्या.

चरणदास मार्केटशेजारील साती आसरा माता मंदिर परिसरातील एका वेलनेस सेंटरसमोरून त्या पायी जात असताना, मागून मोपेड दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे पोत आणि सोनसाखळी असा ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार भामरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

चोरट्यांचे लक्ष मुख्यत्वे सोन्यावर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नाशिक शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरटे आणि तोतया पोलीस सक्रिय झाले असून, त्यांचे मुख्य लक्ष रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर आहे. चेकिंगच्या बहाण्याने किंवा मदतीचे नाटक करून दागिने काढून घेणाऱ्या अथवा हिसकावणाऱ्या अशा भामट्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून अंगावरील दागिने काढून कागद/रुमालात ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.