चार हजारांची लाच घेतली... आता नाशिक कोर्टाने दिली ही शिक्षा...

Share:
Main Image
Last updated: 07-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ सप्टेंबर - शेतजमिनीच्या नकाशातील चुकीची नोंद दुरुस्त करून मूळ प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात ४ हजार रुपयांची लाच स्वीकारणारे देवळा भूमी अभिलेख कार्यालयाचे तत्कालीन उपअधीक्षक सुरेश पर्वत वेताळ (वर्ग-२) यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे! न्यायालयाने त्यांना ३ वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

काय होते प्रकरण?

तक्रारदार यांच्या मौजे चिंचवे येथील शेतगटाच्या एकत्रीकरण योजनेतील नकाशामध्ये चुकीची नोंद झाली होती. ही दुरुस्ती करून मूळ प्रकरण पुढे पाठवण्यासाठी तत्कालीन उपअधीक्षक सुरेश वेताळ यांनी ३० मार्च २०१२ रोजी शासकीय पंचांसमक्ष ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली होती. पथकाने देवळा येथील कार्यालयात सापळा रचून वेताळ यांना त्यांच्या दालनातच तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाचा निकाल:

तपास पूर्ण झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ मार्च २०१४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. कथारे यांच्या न्यायालयात पार पडली.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सुरेश वेताळ यांना दोषी ठरवले व पुढीलप्रमाणे शिक्षा ठोठावली:

 कलम ७ अंतर्गत: २ वर्षे कारावास व २,००० रुपये द्रव्यदंड (दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास).

Advertisement

 कलम १३(२) अंतर्गत: ३ वर्षे कारावास व ३,००० रुपये द्रव्यदंड (दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास).

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. विजय गायकवाड व ॲड. शिरीष कडवे यांनी प्रभावी कामकाज पाहिले.

सदर कारवाई व न्यायालयीन पाठपुरावा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार नाईक, कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, प्रफुल्ल माळी आणि विलास निकम यांनी पूर्ण केला..

लाच मागणाऱ्यांची निर्भिडपणे तक्रार करा: 

ACB चे आवाहन कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे निर्भिडपणे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टोल फ्री क्रमांक: १०६४

नाशिक कार्यालय दूरध्वनी: ०२५३-२५७५६२८, २५७८२३०

व्हॉट्सॲप क्रमांक: ९५४५६५१०६४

Advertisement

Comments

No comments yet.