चाकूच्या धाकाने उकळली सव्वा दोन लाखांची खंडणी... पंचवटीतील कुख्यात खंडणीखोरावर तिसरा गुन्हा...

Share:
Main Image
Last updated: 07-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ सप्टेंबर - पंचवटी परिसरातील बहुचर्चित आणि कुख्यात खंडणीखोर सद्दाम शेख याच्या गुन्हेगारीच्या मालिका थांबायचे नाव घेत नसून, त्याच्यावर आता तिसरा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात कमिशन एजंट (ब्रोकर) म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन सव्वा दोन लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संशयितांवर झाला गुन्हा दाखल:

भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम बाबू शेख (रा. अमृतधाम), 'मामू' नावाचा इसम आणि त्यांचे दोन अनोळखी साथीदार अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश महेश झाल्टे (वय ३९, रा. साईनगर, अमृतधाम, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. झाल्टे हे व्यवसायिक वाहन चालक असून जमीन खरेदी-विक्रीचे मध्यस्थ म्हणूनही काम पाहतात.

२०२४ पासून सुरू होता छळ:

संशयित सद्दाम शेख आणि त्याच्या साथीदारांनी २०२४ पासून झाल्टे यांना धाकदडपशा दाखवून 'हप्त्या'च्या नावाने पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. झाल्टे ट्रॅक्टर हाऊस भागात गेले असताना संशयितांनी त्यांचे वाहन अडवून चाकूचा धाक दाखवला. "गँग चालवण्यासाठी २० हजार रुपये द्यावे लागतील," अशी धमकी देत वेळोवेळी १ लाख २० हजार रुपयांची रक्कम बळजबरीने वसूल केली.

साठेखतावर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या अन् बीएमडब्ल्यूतून अपहरण:

Advertisement

भामट्यांची मुजोरी एवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी एकदा झाल्टे यांना दोन तास डांबून ठेवले आणि 'मामू' नावाच्या इसमामार्फत २२ डिसेंबर २००३ चे एक साठेखत मागवून घेतले. झाल्टे यांच्या वडिलांचे नाव साक्षीदार म्हणून टाकण्यास सांगत चाकूच्या धाकाने साठेखतावर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या करून घेतल्या.

त्यानंतर, झाल्टे यांनी हप्ता देणे बंद केल्याने गेल्या महिन्यात भामट्यांनी सर्व सीमा ओलांडल्या. खडकाळी भागात झाल्टे आले असता, संशयित बीएमडब्ल्यू (BMW) कारमधून आले आणि त्यांनी झाल्टे यांना जबरदस्तीने कारमध्ये डांबले. जीवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा १ लाख रुपयांची खंडणी उकळली.

पोलिसांत धाव; तपासाला वेग:

संशयितांची पैशांची मागणी दिवसेंदिवस वाढतच गेल्याने अखेर त्रस्त झालेल्या झाल्टे यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी चारही संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

सद्दाम शेखच्या गुन्हेगारीची मोठी पार्श्वभूमी

बहुचर्चित संशयित सद्दाम शेख याच्यावर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. यापूर्वी त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची जमीन बळकावून मूळ मालकाकडेच खंडणी मागणे, बेकायदेशीर सावकारी करणे यांसारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर लागोपाठ दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमुळे नाशिकमधील भू-माफिया आणि खंडणीखोरांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.