सातपूरमधील हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर छापा... ८६.७८ लाखांच्या मुद्देमालासह ४९ जण ताब्यात...

Share:
Main Image
Last updated: 07-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ सप्टेंबर - शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्तालय ॲक्शन मोडवर आले असून गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सातपूर परिसरात सुरू असलेल्या एका हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर छापा टाकला. सातपूर बजरंग नगरमधील 'आण्णाचा मळा' भागात बंद हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या जुगार क्लबवर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ८६ लाख ७८ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधारांसह एकूण ४९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

बंद हॉटेलच्या शेडमध्ये सुरू होता 'तीन पत्ती'चा डाव

सातपूर कॉलनीतील बजरंग नगर परिसरामध्ये 'आण्णाचा मळा' नावाच्या बंद हॉटेलच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या तीन पत्ती नावाचा जुगार खेळविला जात असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस उपनिरीक्षक संजय सानप आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.  

जुगारासाठी दिल्या होत्या विशेष सुविधा

Advertisement

छापा टाकला असता संशयित सचिन आण्णासाहेब गांगुर्डे (वय ३९, रा. सातपूर कॉलनी) आणि अनिल दत्ता शेजवळ (वय ४२, रा. सातपूर गाव) यांनी संगनमत करून हा बेकायदेशीर अड्डा सुरू केल्याचे उघडकीस आले. पैशांच्या मोबदल्यात येथे येणाऱ्या जुगारांसाठी टेबल, खुर्च्या, पत्ते, एअर कुलर आदी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. संशयित सचिन गांगुर्डे हा काउंटरवर बसून पैसे व साहित्यासह जुगार चालवत होता, तर त्याचे साथीदार जुगार भरवण्याचे काम करत होते.  

रोख रक्कम, मोबाईल व चारचाकी वाहने जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून जुगार खेळणारे आणि खेळविणारे अशा एकूण ४९ जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, महागडे मोबाईल फोन आणि चारचाकी वाहने असा एकूण तब्बल ८६ लाख ७८ हजार ३४५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सपोउनि नंदकुमार नांदुर्डीकर यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ४ व ५ अन्वये सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

कारवाई करणारे पथक

सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, श्रेणी पोउनि यशवंत बेंडकोळी, सपोउनि नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण तसेच पोलीस अंमलदार तेजस मते, प्रदीप नन्नवरे, प्रवीण वानखेडे आणि जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Advertisement

Comments

No comments yet.