नाशिक, (प्रतिनिधी) ६ सप्टेंबर - ग्रामीण व आदिवासी भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच पारंपरिक रानभाज्या, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पौष्टिक आहाराचा प्रसार करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आकांक्षित तालुका कार्यक्रम आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रानभाज्या महोत्सव व आकांक्षा हाट–२०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री, नाशिक गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला.
यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महिला स्वयंसहायता समूहांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार असून, या संधीचा ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपयोग करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
“सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महिला स्वयंसहायता समूहांना रोजगार आणि व्यवसायाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येईल. महिलांनी केवळ बचत गटापुरते मर्यादित न राहता उत्पादन, विक्री, खाद्यपदार्थ आणि विविध सेवा क्षेत्रांत पुढे यावे. महिलांच्या हातात रोजगाराचे साधन दिल्यास त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. उमेदच्या माध्यमातून राबविण्यात येणारे पिंक ई-रिक्षासारखे उपक्रम महिला आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहेत,” असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
यावेळी महिला सक्षमीकरणाचा संदेश देत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उमेद अभियानातील ग्रामीण महिला स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या ‘पिंक ई-रिक्षा’मधून कार्यक्रमस्थळी प्रवेश केला.
महोत्सवात महिला बचत गटांनी पारंपरिक रानभाज्या, स्थानिक खाद्यपदार्थ, नागलीपासून तयार केलेले पौष्टिक पदार्थ, हस्तकला वस्तू तसेच ‘तत्त्व’ ब्रँडअंतर्गत ब्लॉक प्रिंटिंग केलेल्या बेडशीट, पिलो कव्हर, कुर्ती आदी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली. दि. ३ ते ५ सप्टेंबर या तीन दिवसांत एकूण ₹१० लाख ११ हजार ४५० रुपयांची विक्री झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक महेश पाटील व महिला बचत गटांच्या सदस्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.