नाशिकमध्ये सराईत घरफोड्यांचे त्रिकूट पोलिसांच्या जाळ्यात... ८ गुन्हे उघडकीस...

Share:
Main Image
Last updated: 06-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ सप्टेंबर - गंगापूर रोड परिसरात सलग घरफोड्या करून नागरिकांमध्ये घबराट पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या त्रिकुटाला जेरबंद करण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मोठे यश आले आहे. चोरीचा माल विक्रीसाठी आलेले असताना पोलिसांनी रचलेल्या चाणाक्ष सापळ्यात हे तिघे अडकले. या कारवाईमुळे गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तब्बल ८ घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यांच्याकडून ६ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

नेमकी घटना काय?
शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ चे हवालदार प्रशांत मरकड आणि प्रदीप म्हसदे यांना गंगापूर रोड परिसरातील घरफोडीतील संशयित चोरीचा माल विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी व्ही. एन. नाईक महाविद्यालय आणि डोंगरे वसतिगृह मैदान परिसरात तात्काळ सापळा रचला. संशयित त्या ठिकाणी येताच दबा धरून बसलेल्या पथकाने अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले संशयित:

अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी कॅनडा कॉर्नर येथील ख्रिश्चनवाडी परिसरातील रहिवासी असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. लकी विल्सन भंडारे (वय २०)
२. उमेश कैलास ठोके (वय २३)
३. अजय गोपिचंद बच्छीरे (वय २०)

लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून चोरीचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या ६ लाख ३१ हजार ७०० रुपयांच्या मुद्देमालात प्रामुख्याने:
४५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ५ लगडी
२ पुरातन नाणी
१ कॅमेरा
५८ हजार रुपयांची रोख रक्कम

कारवाई करणारे पथक:

ही धडक कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रेय पोटे, रमीज शेख, किरण शिरसाठ, जमादार योगीराज गायकवाड, हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, रमेश कोळी, नाझिमखान पठाण, रवींद्र आढाव, देविदास टाकरे, उत्तम पवार, रोहिदास लिलके, मुश्रीफ शेख तसेच अंमलदार राम बर्डे, अमोल कोष्टी आणि मुक्तार शेख यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

गंगापूर रोड परिसरातील सराईत घरफोड्यांचा पर्दाफाश झाल्याने नागरिक आणि व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, नाशिक शहर पोलिसांच्या युनिट-१ चे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.