अक्षय काळे, (मुंबई) ६ सप्टेंबर - जोगेश्वरी आणि गोरेगाव परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पांमध्ये मूळ पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र व बोगस व्यक्तींना सदनिका वाटप केल्याच्या गंभीर तक्रारींची तातडीने दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणात ओशिवरा व्हिलेज प्रकल्पातील दोषी सक्षम प्राधिकारी आणि सहायक निबंधक अशा दोन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
तसेच, ज्या-ज्या एसआरए प्रकल्पांच्या वाटपाबाबत तक्रारी आहेत, त्या सर्वांचा सविस्तर आढावा घेऊन संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील प्रश्नांवर विशेष आढावा बैठक
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित पुनर्विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि नागरी प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला खासदार रवींद्र वायकर, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, एसआरएचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बोरीकर आणि मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व निर्देश:
संक्रमण शिबीर (PTC) घोटाळ्याची चौकशी: विकासकाने नियमानुसार कायमस्वरूपी संक्रमण शिबिराच्या (PTC) दोन इमारती एसआरएकडे हस्तांतरित न करता त्यांची परस्पर विक्री केल्याचे बैठकीत समोर आले. या संपूर्ण गैरव्यवहाराची कडक चौकशी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मेट्रो स्थानकाला 'हरे रामा हरे कृष्णा' नाव: मेट्रो मार्गिका २-ब मधील पूर्व-पश्चिम स्थानकास जोडणाऱ्या स्थानकाला ‘हरे रामा हरे कृष्णा’ नाव देण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून, हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.
जोगेश्वरी गुंफांचा पर्यटन विकास: ऐतिहासिक जोगेश्वरी गुंफांचा पर्यटन विभागामार्फत सर्वांगीण विकास केला जाईल, यासाठी राज्य सरकार आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
एसआरएसाठी सक्षम कायदेतज्ज्ञांची टीम: न्यायप्रविष्ट असलेल्या एसआरएच्या प्रकरणांमध्ये न्यायालयासमोर भक्कम बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ व सक्षम कायदेतज्ज्ञांची विशेष टीम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आरे-आप्पा पाड्यात मूलभूत सुविधा: आरे कॉलनीतील आप्पा पाडा येथील नागरिकांना नागरी सोयी-सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिका, वन विभाग आणि आदिवासी विकास आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून त्वरित निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले.
बाधित रहिवाशांना चावी वाटप: सर्वोदयनगर येथील 'मेट्रो ६' मुळे बाधित झालेल्या रहिवाशांना पुनर्वसनांतर्गत सदनिका देण्यात आल्या असून, प्रातिनिधिक स्वरूपात ६ बाधितांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले.