नाशिक, (प्रतिनिधी) ५ सप्टेंबर - फायनान्स कंपनीकडून अल्प व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रॉसेसिंग फीच्या नावाखाली ही रक्कम ऑनलाईन उकळल्यानंतर पाच महिने उलटूनही कर्ज न मिळाल्याने पीडिताने अखेर पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संशयितावर गुन्हा दाखल
या फसवणूक प्रकरणी अरबाज जाफर शेख (रा. एकलहरे, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित भामट्याचे नाव आहे. याबाबत गोपीचंद उत्तम पिंगळे (रा. नामको हॉस्पिटलमागे, आरटीओ पेठरोड, नाशिक) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
असा घडला फसवणुकीचा प्रकार
मित्रतेतून आर्थिक मदतीचा पुढाकार: गोपीचंद पिंगळे यांच्या वेदांत वक्ते या मित्राच्या बहिणीचे लग्न असल्याने पिंगळे यांनी त्याला आर्थिक मदत करण्याचे ठरवले होते.
आडगाव नाका येथे भेट: कर्ज मिळवण्यासाठी दोन्ही मित्रांनी एप्रिल महिन्यात संशयित अरबाज शेख याची भेट घेतली. संशयिताने त्यांना अल्प व्याजदरात ३ लाख रुपयांचे फायनान्स कर्ज मिळवून देण्याची पक्की ग्वाही दिली.
प्रॉसेसिंग फीच्या नावाखाली उकळले पैसे: आडगाव नाका येथील 'झुडिओ' शोरूममध्ये झालेल्या भेटीदरम्यान संशयिताने कर्ज मंजुरीच्या प्रॉसेसिंग फी पोटी पैशांची मागणी केली. पिंगळे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून ऑनलाईन स्वरूपात ३८ हजार रुपये ट्रान्सफर केले.
पैसे उकळल्यानंतर पाच महिने उलटूनही संशयिताने कर्ज मिळवून दिले नाही आणि प्रॉसेसिंग फी म्हणून घेतलेले ३८ हजार रुपयेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिंगळे यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप सानप करत आहेत.