मनोहर शिंदे, (नाशिक) ५ सप्टेंबर - विसापूर (ता. कळवण) येथील शासकीय आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थिनी कु. सृष्टी सूर्यवंशी हिच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सतर्क केली असून सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आदिवासी विकास विभागाकडून मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत इन-कॅमेरा पोस्टमॉर्टम
नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाच्या देखरेखीखाली विविध वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या 'मल्टी-डिसिप्लिनरी' टीमद्वारे कु. सृष्टीचे इन-कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू आजाराशी संबंधित असल्याचे समोर आले असून, सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होईल.
जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल 'डेथ ऑडिट'चे आदेश
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना सखोल 'डेथ ऑडिट' करण्याचे निर्देश दिले आहेत.
तपासणीचे स्वरूप: मृत विद्यार्थिनीचा जन्मापासूनचा आरोग्य इतिहास तसेच मृत्यूपूर्वीच्या २४, ४८ आणि ७२ तासांतील तिची आरोग्यस्थिती, दिलेले वैद्यकीय उपचार व नोंदी यांची सूक्ष्म तपासणी केली जाईल.
कारवाईचा इशारा: या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी, निष्काळजीपणा किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित जबाबदारांवर कडक नियमानुसार कारवाई केली जाईल.
सुधारणा: भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सध्याच्या आरोग्यविषयक कार्यपद्धतीत आवश्यक त्या सुधारणांचाही आढावा घेतला जाणार आहे.
२४ विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार
विसापूर आश्रमशाळेतील सुमारे ४५० विद्यार्थ्यांपैकी २४ विद्यार्थ्यांना सौम्य स्वरूपाचा खोकला व तापाची लक्षणे दिसून आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आणि पालकांमधील चिंता दूर करण्यासाठी त्यांना कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात (SDH) दाखल करण्यात आले आहे.
कोणाचीही स्थिती गंभीर नसून रुग्णालयात पेडियाट्रिशियन (बालरोग तज्ज्ञ), फिजिशियन आणि अतिरिक्त नर्सिंग पथक तैनात करण्यात आले आहे. गरज पडल्यास तातडीने 'हायर सेंटर'ला हलवण्याची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांचे विशेष दक्षतेचे निर्देश
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आमदार नितीन पवार, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, प्रकल्प अधिकारी कश्मीरा संखे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांच्याकडून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे, महिला व बाल विकास विभाग, समाज कल्याण विभागाची वसतिगृहे, अनाथाश्रम आणि रिमांड होममध्ये विशेष दक्षता मोहीम राबवण्यात येत आहे. ताप, खोकला किंवा स्वाईन फ्लूसारखी लक्षणे आढळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करून तात्काळ उपचार करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.