मनोहर शिंदे, (नाशिक) ४ सप्टेंबर - नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) महाराष्ट्र आयोजित सहाव्या ‘रिअल इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर्स समिट २०२६’ मध्ये नाशिकच्या युवा व्यावसायिकांनी राज्यस्तरावर ठसा उमटवला आहे. या परिषदेत जाहीर झालेल्या ‘नरेडको महाराष्ट्र नेक्स्टजेन’च्या नवनियुक्त कार्यकारणीत नाशिकच्या तीन प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण पदांवर निवड करण्यात आली.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ३ सप्टेंबर २०२६ रोजी ही परिषद पार पडली. या परिषदेस मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, बदलापूर, नवी मुंबईसह राज्यभरातून ४०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक व विकासक उपस्थित होते. परिषदेत उद्योगपती प्रणव अदानी, गौतम सिंघानिया यांच्यासह रिअल इस्टेट आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. याप्रसंगी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी कौस्तुभ दवसे यांनी मुंबईसह राज्याच्या पायाभूत विकासासंदर्भात अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.
नाशिकच्या प्रतिनिधींना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रौनक बांदेलकर यांची ‘नरेडको महाराष्ट्र नेक्स्टजेन’च्या अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली. युवा रिअल इस्टेट व्यावसायिकांना बळकट व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने गठीत करण्यात आलेल्या या समितीत नाशिकच्या प्रतिनिधींना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे:
शशांक देशपांडे (नरेडको नाशिक): उपाध्यक्ष, नरेडको महाराष्ट्र नेक्स्टजेन
ऋचिक शिरुडे (अध्यक्ष, नरेडको नेक्स्टजेन नाशिक): समिती सदस्य
शुभम पाटील: समिती सदस्य
नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला राज्यस्तरावर बळ
नाशिकच्या युवा नेतृत्वाला मिळालेल्या या राज्यस्तरीय संधीमुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या समस्या, संधी आणि योजनांना थेट राज्य पातळीवर प्रभावी प्रतिनिधित्व मिळणार आहे. या निवडीबद्दल नरेडको नाशिकच्या वतीने सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.