दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ४ सप्टेंबर - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आज दिंडोरी तालुक्यातील विविध शासकीय संस्थांना भेट देऊन आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र उमराळे येथे प्रत्यक्ष भेट देत आरोग्य सेवांची पाहणी केली. यासोबतच जिल्हा परिषद शाळा उमराळे व जिल्हा परिषद शाळा रासेगाव येथे भेट देऊन शैक्षणिक सुविधांसह निपुण महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
आरोग्य विभागाच्या आढाव्यानंतर उमराळे आरोग्य केंद्राची पाहणी
दोन दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेतला होता. या बैठकीत ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांची कार्यक्षमता वाढविणे आणि उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला होता.
या अनुषंगाने आज त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र उमराळे येथे भेट देऊन बाह्यरुग्ण विभाग, औषधसाठा, उपलब्ध आरोग्य सेवा, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
उमराळे शाळेत निपुणच्या प्रगतीचा आढावा
जिल्हा परिषद शाळा उमराळे येथे भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पायाभूत सुविधा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. तसेच निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, वाचन-लेखन तसेच मूलभूत गणितीय कौशल्यांची स्थिती काय आहे, याबाबत शिक्षकांकडून माहिती घेतली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अभ्यासाबाबत तसेच वाचन, लेखन आणि गणित विषयातील प्रगतीबाबत प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे उत्तरे देत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
रासेगाव शाळेत विद्यार्थ्यांशी साधला संवाद
जिल्हा परिषद शाळा रासेगाव येथेही त्यांनी शाळेतील विविध सुविधांची पाहणी करून निपुण अभियानाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अभ्यासाची पद्धत, आवडते विषय, वाचनाची सवय आणि भविष्यातील ध्येय याबाबत त्यांनी चर्चा केली.
विद्यार्थ्यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी उत्स्फूर्तपणे संवाद साधला. नियमित वाचन, लेखनाचा सराव आणि मूलभूत गणितीय कौशल्ये विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या पायाभूत शैक्षणिक क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी निपुण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी शिक्षकांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, संबंधित वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.