नाशिक, (प्रतिनिधी) ४ सप्टेंबर - अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एका महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड परिसरात उघडकीस आली आहे. कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन संशयिताने हे कृत्य केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र रघुनाथ दळवी (रा. पारशीवाडी, कोपरी कॉलनी, ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी जेलरोड येथील सद्गुरूनगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
असा घडला प्रकार:
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रवींद्र दळवी हादेखील सद्गुरूनगर भागात वास्तव्यास होता. गत २३ फेब्रुवारी रोजी संशयिताने ठाणे येथे जायचे असल्याचे सांगत, "मला नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दुचाकीवरून सोडून दे," असा बहाणा करून महिलेला आपल्या घरी बोलावले. महिला घरी आली असता, संशयिताने तिला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध पाडले. महिला अस्वस्थ झाल्यानंतर संशयिताने तिच्यावर प्रथम अत्याचार केला आणि मोबाइलमध्ये अश्लील फोटो व व्हिडिओ शूट केले.
पाच महिने ब्लॅकमेलिंग आणि अत्याचार:
त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन संशयिताने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. संशयिताने पीडितेला गुजरात राज्यातील सापुतारा तसेच ओझर येथील विविध हॉटेल्समध्ये नेऊन तब्बल पाच महिने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले.
पीडितेची पोलिसांत धाव:
संशयिताचा त्रास आणि मागण्या दिवसेंदिवस वाढत गेल्याने त्रस्त झालेल्या पीडित महिलेने अखेर हिंमत दाखवून नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले व आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षितीजा ठुबे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.