केशव खेडकर, (नाशिक) ४ सप्टेंबर - खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळलेल्या जिल्ह्यातील आणखी १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून आतापर्यंत 154 परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे.
खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनांतर्गत शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांची गुणवत्तापूर्ण विक्री सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या सुनावणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान आढळलेल्या प्रमुख त्रुटी:
तपासणी मोहीम : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू आहे.
आढळलेल्या त्रुटी : तपासणीदरम्यान e-POS मशीनमध्ये अनियमितता असणे, दर फलक व साठाफलक अद्ययावत नसणे, अभिलेखे व्यवस्थित न ठेवणे, एन फॉर्ममध्ये साठा रजिस्टर न ठेवणे, शेतकऱ्यांना पावती न देणे आदी त्रुटी आढळल्या. संबंधित कायद्यान्वये नोटीस बजावून आज प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ९ एप्रिल २०२६ पासून आजअखेर खते १०८, बियाणे २६ व कीटकनाशके २० असे एकूण १५४ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच एकूण ५२ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. राज्यात परवान्यावर सर्वाधिक कारवाई करणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा ठरला आहे.
“शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची विक्री किंवा जादा दराने विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कृषी सेवा केंद्रांमध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे,” असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत आणि खरेदीवेळी पक्के बिल अवश्य घ्यावे. कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी. तक्रारींसाठी तालुकानिहाय कृषी अधिकारी, गुणनियंत्रण व कृषी अधिकारी यांच्या संपर्क क्रमांकावर तसेच जिल्हास्तरीय ७६२७०३७४०८ या क्रमांकावर WhatsApp द्वारे तक्रार करता येईल.
तालुकानिहाय कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण यांचे संपर्क क्रमांक असे :
नाशिक - 9185215369
इगतपुरी - 9185215629
त्र्यंबकेश्वर - 9185215400
पेठ - 9185215487
निफाड - 9011619675
सिन्नर - 9185215128
येवला - 9185215584
चांदवड - 9185215172
कळवण - 9185215274
देवळा - 9185215305
दिंडोरी - 9185215228
सुरगाणा - 9185215324
मालेगाव - 9185215517
बागलाण - 9185215066
नांदगाव - 9185215021