मनोहर शिंदे, (नाशिक) ०४ सप्टेंबर - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर भाविकांची सेवा करणाऱ्या धार्मिक व सेवाभावी संस्थांना १५ लाख रुपयांपर्यंत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने राबवलेल्या पहिल्या टप्प्यात ८४ संस्थांची यशस्वी ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. या अर्जांची प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील सेवाभावी संस्थांना सोयी-सुविधा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार १९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत क्यूआर कोड आधारित डिजिटल प्रणालीद्वारे हे अर्ज स्वीकारण्यात आले. कुंभमेळ्याच्या इतिहासात प्रथमच अशा पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने धार्मिक संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे.
संस्थानांचा सर्वाधिक सहभाग:
प्राप्त ८४ अर्जांमध्ये ४५ संस्थानांचा समावेश असून, १३ आश्रम, १२ आखाडे, ६ मंदिरे, ५ मठ तसेच साधू निवास आणि इतर संस्थांचा समावेश आहे. सध्या सर्व अर्ज 'Submitted' स्थितीत असून पडताळणी सुरू आहे. अद्याप कोणत्याही निधीचे वितरण करण्यात आलेले नाही.
७१ संस्था नाशिक जिल्ह्यातील:
नोंदणीकृत संस्थांपैकी ७१ संस्था नाशिक जिल्ह्यातील आहेत (नाशिक- ३५, त्र्यंबकेश्वर- २०, सिन्नर- ५, इगतपुरी- ४, मालेगाव- २, चांदवड- २, दिंडोरी, निफाड व कळवण- प्रत्येकी १). याशिवाय शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान, प्रयागराज, अहमदाबाद, छत्रपती संभाजीनगर, पुणे, ठाणे, नंदुरबार आणि जळगाव येथील १३ संस्थांनीही नोंदणी केली आहे.
४.४८ कोटी भाविकांच्या आगमनाचा अंदाज:
या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभमेळ्यात ४.४८ कोटींहून अधिक भाविकांच्या उपस्थितीचा आणि ८.१५ कोटींहून अधिक मुक्कामी भाविकांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंचवटीतील समस्त पाथरवट समाज मारुती मंदिर संस्थेने सर्वाधिक ३.४ कोटी भाविकांचा अंदाज नोंदवला आहे.
५.६८ कोटींच्या सुविधांची मागणी:
नोंदणीकृत संस्थांपैकी ३१ संस्थांनी एकूण ५ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपयांच्या पायाभूत सुविधांची मागणी केली आहे. यात क्रांतीकारी राष्ट्रसंत इंद्रदेवजी राधारास बिहारी बहुउद्देशीय संस्थेने सर्वाधिक ७७.१ लाख रुपयांची मागणी नोंदवली आहे.
तपासणीनंतर प्रस्ताव प्राधिकरणाकडे:
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत हे संस्थांची व त्यांच्या मागण्यांची प्रत्यक्ष पडताळणी करत आहेत. पडताळणीनंतर हे प्रस्ताव नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जातील. प्राप्त माहितीचा वापर गर्दी नियंत्रण, स्वच्छता, आरोग्य व वाहतूक नियोजनासाठी केला जाणार आहे.