नाशिक, (प्रतिनिधी) ०४ सप्टेंबर - आपल्या मुलांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा विनयभंग करून तिला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना नेहरूनगर येथील शासकीय वसाहतीत घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष बहिरम पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित संतोष पाटील याने पीडित महिलेच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला मारहाण केली होती. या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी पीडित महिला गुरुवारी (दि. ३) सायंकाळच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या शासकीय वसाहतीत संशयिताकडे गेली होती.
महिला त्याला शांततेत समजून सांगण्याचा प्रयत्न करत असताना, संशयित अचानक भडकला. त्याने पीडितेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. या झटापटीत त्याने महिलेचा विनयभंग केला, तसेच "तुला आणि तुझ्या मुलाला सोडणार नाही," अशी जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडितेने तत्काळ उपनगर पोलीस ठा गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी संशयित संतोष पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.