रुग्णाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये टोळक्याचा धुडगूस... डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण, आयसीयूची तोडफोड...

Share:
Main Image
Last updated: 04-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ०४ सप्टेंबर -  निमाणी परिसरातील ‘आयुष हॉस्पिटल’मध्ये एका महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी जोरदार धुडघूस घातला. टोळक्याने रुग्णालयात घुसून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत अतिदक्षता विभागाची (ICU) तोडफोड केली. या हिंसक घटनेमुळे रुग्णालयात भीतीचे सावट पसरले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जैन, जितेंद्र पाटील आणि त्यांचे अन्य ३ ते ४ साथीदार (सर्व रा. पंचवटी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचारी आयुष प्रवीण तायडे (रा. गुंजाळबाबानगर, पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे.

नेमकी घटना काय?

Advertisement

मंगळवारी (दि. १) रत्ना सचिन जैन (३७, रा. प्रीती अपार्टमेंट, पंचवटी) या महिलेस गंभीर अवस्थेत आयुष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा राग धरून संशयितांनी साथीदारांसह रुग्णालयात प्रवेश केला. संतप्त टोळक्याने विविध विभागात बळजबरीने घुसून शिवीगाळ करत प्रचंड आरडाओरड केली व दहशत माजवली.

डॉक्टरांवर हल्ला अन् तोडफोड

यावेळी कर्तव्यावर असलेले डॉ. अक्षय पाटील आणि डॉ. मिलिंद पाटील यांच्यासह दीपतेश दोंदे, दुर्गेश बच्छाव व प्रशांत धुमाळ या कर्मचाऱ्यांना टोळक्याने अंगावर धावून जात मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, टोळक्याने अतिदक्षता विभागाच्या (ICU) काचा फोडून मालमत्तेचे मोठे नुकसान केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे रुग्णालयातील इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमधे प्रचंड घबराट पसरली होती.

या घटनेची गंभीर दखल घेत पंचवटी पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.