नाशिक, (प्रतिनिधी) ३ सप्टेंबर - निरोगी नागरिक, आरोग्यदायी कुटुंब आणि आरोग्यसंपन्न गाव या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत ३० वर्षे व त्यावरील सर्व महिला व पुरुषांची विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत सात टप्प्यांमध्ये या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
या अभियानाचे नियोजन जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, तांत्रिक व आरोग्यविषयक अंमलबजावणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या अधिपत्याखाली केली जात आहे.
अभियानाचे मुख्य उद्दिष्ट: असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारा उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच कर्करोगासारख्या असंसर्गजन्य आजारांचा (NCDs) धोका वेळेत ओळखणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.
या आजारांचे होणार मोफत स्क्रीनिंग:
उच्च रक्तदाब (High BP)
मधुमेह (Diabetes)
तोंडाचा कर्करोग (Oral Cancer)
स्तनाचा कर्करोग (Breast Cancer)
गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer)
हे आजार सुरुवातीच्या काळात कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे ‘आजार होण्याची वाट पाहण्यापेक्षा आजच तपासणी’ हा दृष्टिकोन ठेवून ग्रामीण भागातील ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचा आरोग्य डेटा संकलित केला जाणार आहे.
सात टप्प्यांत होणार अंमलबजावणी
हे अभियान केवळ एक दिवसाचे आरोग्य शिबिर नसून, नियोजनबद्ध ७ टप्प्यांची मालिका आहे:
टप्पा १: आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
१ ते १५ सप्टेंबर २०२६
आरोग्य अधिकारी, कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) व आशा स्वयंसेविकांचे सर्वेक्षण आणि स्क्रीनिंगबाबत प्रशिक्षण.
टप्पा २: Line Listing व NPNCD नोंदणी
१६ ते २१ सप्टेंबर २०२६
३० वर्षांवरील सर्व नागरिकांची एनपीएनसीडी (NPNCD) पोर्टलवर नोंदणी व माहिती अद्ययावतीकरण.
टप्पा ३: गावपातळीवरील प्राथमिक Screening
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६
प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन नागरिकांची प्राथमिक आरोग्य व कर्करोग जोखीम तपासणी.
टप्पा ४: उर्वरित गावांमध्ये Screening
३ ते १३ ऑक्टोबर २०२६
पहिल्या टप्प्यात राहिलेल्या गावांमध्ये विशेष पथकांद्वारे तपासणी पूर्ण करणे.
टप्पा ५: HWC स्तरावर पुढील तपासणी
१४ ते ३० ऑक्टोबर २०२६
आरोग्य वर्धिनी केंद्रांवर (HWC) संशयित रुग्णांचे सखोल मूल्यांकन व पुढील मार्गदर्शन.
टप्पा ६: तालुका व जिल्हास्तरीय तपासणी
१ ते १० नोव्हेंबर २०२६
संशयित रुग्णांची तालुका व जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञांमार्फत मोफत तपासणी.
टप्पा ७: तृतीयस्तरीय आरोग्य सेवा
१० नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६
विशेष उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालये किंवा तृतीयस्तरीय केंद्रांमध्ये पाठवून मोफत उपचार.
जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
"३० वर्षे व त्यावरील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून गंभीर आजारांचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे हे या अभियानाचे मुख्य ध्येय आहे. नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तुमच्या घरापर्यंत पोहोचत आहे. नागरिकांनी 'तपासणी करा – आजार ओळखा – वेळेत उपचार घ्या' या तत्त्वाचा अवलंब करून अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा."
— डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक