नाशिक, (प्रतिनिधी) ३ सप्टेंबर - कोट्यावधींची जमीन बळकावून मूळ मालकाकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या बेकायदा सावकारांच्या टोळीवर पंचवटी पोलीस ठाण्यात आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. एका मेडिकल स्टोअर्स चालकाचे अपहरण करून, त्याला डांबून ठेवत जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि ५० लाखांच्या खंडणीसाठी अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन भूखंड बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी सद्दाम बाबू शेख आणि लता बर्डे (दोघे रा. अमृतधाम, पंचवटी) या संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पुंडलीक शिरोडे (वय ४६, रा. सनराईज रेसिडेन्सी, अमृतधाम) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
२० लाखांच्या बदल्यात ४८ लाख दिले, तरी ५० लाखांची मागणी
पोलीस तक्रारीनुसार, तक्रारदार विजय शिरोडे यांचे मेडिकल स्टोअर्स असून, २०२१ मध्ये व्यवसाय वाढीसाठी त्यांनी बेकायदा सावकारी करणाऱ्या सद्दाम शेख याच्याकडून २० लाख रुपये व्याजाने घेतले होते. शिरोडे यांनी वेळोवेळी संशयितांना मुद्दलासह तब्बल ४८ लाख रुपये परत केले. तरीही संशयितांचे समाधान झाले नाही.
संशयितांनी शिरोडे यांना अमृतधाम येथील भगवती हॉटेल येथे बोलावून घेतले. तेथे त्यांना बेदम मारहाण करत गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जबरदस्तीने कारमध्ये बसवून 'गोल्डस्टार' या बांधकाम साईटच्या कार्यालयात नेऊन तब्बल चार तास डांबून ठेवले. अजूनही मुद्दल आणि व्याज बाकी असल्याचे सांगत आरोपींनी ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
'ॲट्रॉसिटी'ची धमकी अन् भूखंडावर ताबा
पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत संशयितांनी शिरोडे यांच्या सर्व्हे नं. २६१/२ या भूखंडाच्या 'डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट'वर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्या आणि प्लॉटचा ताबा घेतला. यावेळी संशयित लता बर्डे हिने, "हा भूखंड सद्दाम शेख याच्या नावावर करून दिला नाही, तर तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करेन," अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
टोळीवर गुन्ह्यांची मालिका
संशयित सद्दाम शेख आणि त्याच्या साथीदारांवर काही दिवसांपूर्वीच आडगाव पोलीस ठाण्यात जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवून मूळ मालकाकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. आता पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरण, खूनाचा प्रयत्न, बेकायदा सावकारी आणि खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव करत आहेत.