पुणे, (प्रतिनिधी) ३ सप्टेंबर - गणेशोत्सवातील डीजे आणि उच्च डेसिबलच्या ध्वनीप्रदूषणाविरोधात ठाम भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना पुण्यात बेदम मारहाण झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील टिळक रोडवरील कशाळे चौकात काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या पूर्वतयारी बैठकीत आणि सार्वजनिक व्यासपीठांवर विद्यानंद बापट यांनी डीजे व लाऊडस्पीकरच्या तीव्र आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. याच मुद्द्यावरून त्यांचा वाद सुरू होता.
टिळक रोडवर ते या विषयावर नागरिकांशी संवाद साधत असताना, काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि कार्यकर्त्यांनी बापट यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या घटनेमुळे पुण्यातील गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मारहाण करणाऱ्यांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.