नाशिक, (प्रतिनिधी) २ सप्टेंबर - अडचणीत असलेल्या महिलांना मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या एका ८० वर्षीय वृद्ध महिलेची हातचलाखीने सोन्याची पोत लांबवल्याची संतापजनक घटना भारतनगर भागात घडली आहे. भामट्या महिलांनी कागदाच्या पुडीत सोन्याच्या पोतीऐवजी माती ठेवून वृद्धेची ३० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तो झिरो नंबरने इंदिरानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झहोराबी दाऊद शेख (वय ८०, रा. गणेशनगर, वडाळागाव) असे फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या २६ ऑगस्ट रोजी भारतनगर भागातील नासर्डी नदी पुलावरून जात असताना दोन अनोळखी महिलांनी त्यांना गाठले. "आम्ही खूप आर्थिक अडचणीत आहोत," अशी बतावणी करत त्यांनी झहोराबी यांचा विश्वास संपादन केला. आपल्याकडे सोन्याचे मणी असून ते गहाण ठेवून किंवा विकून कर्ज मिळवून द्या, अशी विनवणी या भामट्या महिलांनी केली.
सराफाच्या दुकानातील नाट्य आणि फसवणूक:
वृद्धेने मदतीचा हात पुढे करत त्या दोन महिलांना एका सराफाच्या दुकानात नेले. तिथे मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. दागिने सराफाकडेच जमा राहणार असल्याने, वृद्धेने स्वतःच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत काढून संशयित महिलांच्या हवाली केली.
मात्र, सराफाने दागिन्यांच्या खरेदीची मूळ पावती मागितली आणि पावतीशिवाय दागिने घेण्यास नकार दिला. त्यानंतर, संशयित महिलांनी अत्यंत चलाखीने वृद्धेची सोन्याची पोत एका कागदाच्या पुडीत बांधून त्यांच्या पिशवीत ठेवल्याचा बहाणा केला आणि स्वतःच्या दागिन्यांसह ती पोत घेऊन पोबारा केला.
पिशवी उघडली अन् माती निघाली:
घर पोहोचल्यानंतर झहोराबी यांनी पिशवीतील कागदाची पुडी उघडून पाहिली असता, त्यात सोन्याच्या पोतीऐवजी फक्त माती असल्याचे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भगवान भोये करत आहेत.